शंभूराज देसाई यांचे आवाहन

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात कोणत्या अटी आहेत आणि नाहीत याचा खुलासा करा, असे शासनास आवाहन करताना व्याघ्र प्रकल्पाच्या जाचक अटीतून स्थानिक जनतेची सोडवणूक करणार असल्याची ग्वाही पाटणचे शिवसेना आमदार शंभूराज देसाई यांनी दिली.

कोयनानगर येथे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पांतर्गत डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जन-वन योजनेंतर्गत गावांच्या निवडी करून तेथील विकासाकरिता केंद्र व राज्य शासनामार्फत येणारा निधी खर्च करण्याकरिता तसेच प्रकल्पबाधितांच्या समस्या जाणून घेण्यासाठी आयोजित बैठकीत ते बोलत होते. वन अधिकारी एम. एम. पंडितराव, सुभाष पुराणिक, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख जयवंत शेलार, कामरगावचे सरपंच शैलेंद्र शेलार यांच्यासह प्रकल्पबाधितांची मोठी उपस्थिती होती.

शंभूराज देसाई म्हणाले, की केंद्र व राज्य शासनाने घोषित केलेल्या सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचा बाऊ करण्यात आला आहे. प्रकल्पात नानाविध अटी असल्याचे भासवून स्थानिक जनतेमध्ये भीती निर्माण केली जात आहे. र्निबधांचा खोटा प्रचार करून दिशाभूल सुरू आहे. बफरझोनमधील अटींची जनतेला बिलकूल कल्पना नसल्याने गोंधळाची स्थिती आहे. त्यामुळे शासकीय निधी खर्च करण्यासाठी येथील ग्रामस्थांचा सहभाग मिळणार नाही. ही वस्तुस्थिती आहे. तरी, संबंधित अधिकाऱ्यांनी सर्वप्रथम अटी व र्निबधाबाबत खुलासा करावा अशा सूचना शंभूराज देसाई यांनी दिल्या.

या तालुक्याचा आमदार म्हणून आपण जाचक अटीतून जनतेची सोडवणूक करण्यासाठी संघर्ष करत राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. व्याघ्र प्रकल्पाच्या संदर्भाने तालुक्यातीलच काही जण स्वार्थापोटी गैरसमज व अफवा पसरवत असल्याचा आरोप त्यांनी केला. जंगली श्वापदांच्या उपद्रवामुळे होणाऱ्या शेतपिकाच्या नुकसानीच्या भरपाईचे निकष अगदी जुने असल्याने त्यात बदलाची गरज असून, शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची वाढीव मदत मिळवून देण्यासाठीही प्रयत्नशील राहणार असल्याची ग्वाही आमदार देसाई यांनी दिली.