सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या ४५ व्या सर्वसाधारण सभेत इथेनॉल निर्मिती, सहवीज निर्मिती २४ मेगावाॅटचा प्रकल्प, कारखान्याची विस्तारवाढ करण्याच्या ठरावासह विषय पत्रिकेवरील सर्व विषयांना मंजुरी देण्यात आली.
सभेच्या अध्यक्षस्थानी कारखान्याचे अध्यक्ष आमदार बाळासाहेब पाटील हे होते. सभेच्या प्रारंभी कार्यकारी संचालक सी. एन. आहिरे यांनी विषय पत्रिकेचे वाचन केले. विरोधी नेते धर्यशील कदम, मनोज घोरपडे यांनी आपल्या समर्थकांसह सभेला हजेरी लावताना मागील गळीत हंगामातील थकीत ९९ रूपयांच्या बिलांसह उपस्थित केलेल्या प्रश्नांना अध्यक्षांनी उत्तरे दिली. कराड पंचायत समिती सभापती देवराज पाटील, कारखान्याच्या उपाध्यक्षा लक्ष्मीबाई गायकवाड यांची उपस्थिती होती.
या वेळी विठ्ठलराव जाधव, धर्यशील कदम, भरत चव्हाण यांनी मागील अहवालात नमूद केलेले ९९ रूपयांचे थकीत बिल कधी देणार? एफआरपीप्रमाणे शिल्लक २०० रूपये दिवाळीपूर्वी द्यावे, अशी मागणी करत ९९ रूपयांसाठी कोर्टात जाण्याची वेळ आणू नये. सभासदांच्या उसाचे प्रथम गाळप करावे, दुसरे युनिट कधी सुरू करणार, सभासदत्व खुले करून उपेक्षितांना न्याय द्यावा, अ‍ॅग्रिकल्चर कॉलेजमध्ये सभासदांच्या मुलांना फी आकारू नये, पूर्वीपेक्षा आता रिकव्हरी कमी का? असे प्रश्न उपस्थित केले. यावर बोलताना आमदार बाळासाहेब पाटील यांनी केंद्र व राज्य सरकारकडून कारखानदारीला सहकार्य होत नाही. थकित ९९ रूपयांचा हप्ता कारखान्याची आर्थिक परिस्थिती सुधारल्यानंतर दिला जाणार आहे. शिवाय एफआरपीप्रमाणे देय असलेला २०० रूपयांचा हप्ता शासनाकडून ३५ कोटी ८५ लाख लाखाचे अनुदान मिळणार आहे. ते मिळाल्यानंतर लगेच दिला जाणार आहे. साखरेची विक्री केली जात नसल्याचा प्रचार चुकीचा असून साखरेला ग्राहक आणि अपेक्षित दर आला नाही तर साखरेची विक्री कशी करणार, असा प्रतिप्रश्न करून कार्यक्षेत्रात आडसाल उसाचे क्षेत्र वाढल्यामुळेच रिकव्हरीवर परिणाम होत असल्याचा खुलासा करून केंद्र व राज्य शासनाच्या धोरणामुळे साखर कारखानदारीसमोर अडचणी निर्माण होत आहेत. बिगर सभासदांचा ऊस गाळप करण्याची सक्ती असून, कार्यक्षेत्राबाहेरील उसाचे गाळप केले जात नाही. अ‍ॅग्रिकल्चर कॉलेजमध्ये कार्यक्षेत्रातील विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. अजित पाटील यांनी जास्तीचा दर मिळावा अशी आमची मागणी आहे, मात्र उसाला जादा दर मागणारे शिट्टीवाले कुठे आहेत? असा बोचरा सवाल करून मनोज घोरपडे यांनी मदत केली तर काही तरी फायदा होईल असे सांगून संस्थेवर जरूर आरोप करावेत, पण इभ्रतीला धोका पोहचणार नाही याची काळजी घ्यावी, असा घोरपडेंना चिमटा काढून धावरवाडीच्या कारखान्याचा विषय सोडून दिला काय? असा सवाल करताना त्यांनी कृषी कॉलेजला स्वर्गीय पी. डी. पाटील यांचे नाव देण्याची मागणी केली. ऐनवेळच्या विषयावर बोलताना बाळासाहेब पाटील यांनी विस्तारीकरणासाठी प्रयत्नशील असून, त्यासाठी जागेची पाहणी सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.