लंडनच्या संस्थेकडून विक्रमाची नोंद
राहाता : शिर्डी येथील साईबाबा समाधी मंदिराची लंडनच्या वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डस या जागतिक संस्थेने सर्वाधिक भाविकांनी भेट दिलेले मंदिर म्हणून नोंद घेतली असून याबाबतचे पत्र संस्थानला गुरूवारी प्राप्त झाले असल्याची माहिती संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक मुगळीकर यांनी दिली.
मुगळीकर म्हणाले, वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डस संस्था ब्रिटन,अमेरिका, ऑस्ट्रेलिया, मॉरिशस आणि भारत येथे कार्यरत आहे. ही संस्था प्रतिभा आणि क्षमतांना आंतरराष्ट्रीय प्रमाणपत्रासह मान्यता प्रदान करते. त्याशिवाय मानवता आणि वैश्विक शांततेसाठी लक्षणीय सहभाग देणाऱ्या व्यक्ती आणि स्थाने यांची नोंद घेऊन ही संस्था त्यांचा सन्मानही करते. श्री साईबाबांच्या समाधीच्या दर्शनाकरिता दररोज ५० ते ६० हजार भाविक शिर्डीत भेट देतात. संस्थान उत्सव व सुटीच्या दिवशी ही संख्या एक लाखाहून अधिक असते. याबाबींची दखल घेऊन लंडनच्या वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डस समितीने श्री साईबाबा समाधी मंदिर भारतातील सर्वात जास्त भाविकांनी भेट दिलेल्या मंदिरांपैकी एक असल्याचे जाहीर केले आहे.
पत्रात संस्थेने म्हटले आहे की, श्री साईबाबा समाधी मंदिराची भारतातील सर्वाधिक भेट दिल्या गेलेल्या मंदिरांपैकी एक अशी नोंद केली आहे. हे एक धर्मनिरपेक्ष ठिकाण असून येथे सर्व-धर्म-समभाव आहे आणि त्यापैकी श्रद्धा आणि सबुरी यांच्या शक्तीवर सर्वाधिक विश्वास व्यक्त केला जातो. तिथे सर्वजण प्रार्थनेमध्ये नतमस्तक होतात. ज्यांनी आपल्या शुद्ध समतेच्या भावनेतून मानवतेचा आणि शांततेचा असा ‘सबका मालिक एक’ हा मंत्र दिला त्या दिव्य संतांचे हे स्थान आहे. श्री साईबाबांच्या पदस्पर्शाने ही भूमी पवित्र आहे, लवकरच वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डसचे अधिकारी शिर्डीला येऊन हे मानपत्र संस्थानला बहाल करणार असल्याचेही मुगळीकर यांनी सांगितले.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on November 30, 2019 3:16 am