पाचोरा तालुक्यातील चिंचखेडा येथे साईश्रद्धा मार्केटिंगच्या माध्यमातून बेकायदेशीर सोडत योजना चालवून सभासदांची लाखो रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी पाच जणांना पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकारात जिल्ह्यातील अनेक सभासदांची फसवणूक झाल्याचे उघडकीस येत आहे.
किशोर कोळी, योगेश पाटील, प्रशांत ठाकरे, दीपक पाटील या संशयितांनी संगनमताने साईश्रद्धा मार्केटिंगच्या नावाने सोडत सुरू केली होती. या माध्यमातून सभासदांना आकर्षक बक्षिसाचे आमिष देऊन अनेकांची फसवणूक केल्याची तक्रार पाचोरा पोलीस ठाण्यात करण्यात आली होती. त्यानुसार गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी संशयितांना अटक केली. या संशयितांना पाचोरा येथील न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने संशयितांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. तपासादरम्यान संशयितांनी या योजनेसाठी कोणतीही कायदेशीर पूर्तता केली नसल्याचे निष्पन्न झाले आहे. या योजनेच्या माध्यमातून अनेकांची फसवणूक झाली आहे. या सोडतीच्या योजनेत ज्यांची फसवणूक झाली असेल, त्यांनी तात्काळ पाचोरा पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस उपनिरीक्षक अमोल रसाळ यांनी केले आहे.