ग्रामपंचायत निवडणुकीत चित्रफितींचा हायटेक प्रचार

ग्रामपंचायतीच्या निवडणूक प्रचाराला अगदी सराटमधील आर्ची, परशापासून ते थेट अमेरिकेचे ट्रम्प तात्याही रणमदानावर उतरले आहेत. तंत्रस्नेही झालेल्या पिढीच्या हातातील स्मार्ट फोनच्या पडद्यावर ही मंडळी आपआपल्या उमेदवारांचा हिरीरीने प्रचार करीत असतानाच आपल्या गटाच्या प्रचारासाठी आधुनिक तंत्र अवगत असलेली शाळकरी मुलेही निवडणुकीच्या मदानावर वॉररूममधून धडाक्यात संदेशांची देवाणघेवाण करण्यात मश्गुल आहेत.

जिल्ह्यातील ३९५ गावात ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून यंदा प्रथमच हायटेक प्रचार यंत्रणा राबविण्यात येत आहे. सराटमधील आर्ची परशाच्या आवाजाची जोड देऊन या प्रचाराच्या चित्रफिती प्रसारित केल्या जात आहेत. अगदी आर्चीच्या तोंडचे ‘मराठीतून समजत नाही का, इंग्लिशमध्ये सांगू?’ अशा पध्दतीने संवादही या प्रचारफितींमध्ये आहेत. सराटमध्ये ट्रॅक्टर चालवित  मळ्याकडे निघालेली आर्ची इथेही दाखवली आहे. ती परशाच्या आईला ‘मतदान केले का, आत्ती’ असे विचारत ‘मीबी मतदानालाच निघाले आहे, .. चिन्हापुढचं बटण दाबणार आहे’ असं सांगत आहे.

अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प तात्याही या प्रचारात आघाडीवर आहेत. तात्या आपल्या गावाचा विकास करण्यासाठी अमुक पॅनेलला निवडून आणण्याचा प्रेमाचा आग्रह धरतात. या संदेशाला संगीत साज आणि चित्रफिती यांचे बेमालूम मिश्रण प्रत्येक ग्रुपवर फिरत आहे. याचबरोबर उमेदवारांचे कर्तृत्व, कार्यकर्ता म्हणून केलेले काम, मदतीला धावून जाण्याची वृत्ती सांगण्याबरोबरच विविध घोषवाक्यांचाही सर्रास वापर होत आहे. ‘कोण म्हणतंय येत न्हाय, आल्याशिवाय राहत नाही’, ‘यंदा गुलाल आमचाच, एकच ध्यास गावचा विकास’, ‘ना स्वार्थासाठी, ना सत्तेसाठी आमची उमेदवारी केवळ विकासासाठी’, ‘आपला माणूस, कामाचा माणूस’ अशा घोषवाक्यांनी समाजमाध्यमे रंगत आणत आहेत.

या तंत्रस्नेही प्रचाराचा धडाका उडाला असताना प्रत्येक मतदार वैयक्तिक संपर्कातील असल्याने भेटीगाठी सुरूच आहेत. मात्र गावाबाहेर राहणऱ्या लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी ही ‘हायटेक प्रचार’ यंत्रणा फार प्रभावी ठरत आहे. सतत पडणाऱ्या पावसाने ओढय़ा नाल्यांना असलेले पाणी, गाडीवाटेवर असलेला चिखल, रानवाटा बंद झाल्याने संपर्क साधण्यासाठी हा ‘हायटेक प्रचार’ खूप उपयोगी पडत आहे.

हे सारे करणेही खूप सोपे. याला कमीतकमी मनुष्यबळ लागते. खर्चही फार नाही आणि मुख्य म्हणजे आचारसंहितेची कुठलीही अडचण नाही. गावातील लहानमोठय़ा मुलांना ‘इंटरनेट डेटा’ उपलब्ध करून दिला, की ते आपले काम चोख बजावतात.

जिल्ह्यातील ६९९ गावांपैकी ४५३ गावात ग्रामपंचायत निवडणूक होत असून यापैकी ५८ गावच्या निवडणुका अविरोध झाल्या आहेत, तर ३८९ सदस्य अविरोध निवडण्यात आले आहेत. उर्वरित ३९५ गावात प्रचाराची रणधुमाळी आता दोन दिवस चालणार आहे. या वेळेचा उपयोग करून घेण्यासाठी राजकीय वॉररूमवर रात्रभर जागता पहारा ठेवण्यात येत आहे. कोण कोणाला भेटतो, याचे चित्रीकरण मिळण्याची सुविधाही असल्याने डबलगेम करणाऱ्या मतदारांपासून सावध राहणेही उमेदवारांना शक्य झाले आहे.