21 September 2020

News Flash

जेऊरच्या कौतुक वर्षांवात ‘सैराट’चे कलाकार चिंब

गेले काही आठवडे देशभर गाजत असलेल्या ‘सैराट’ चित्रपटाने करमाळा व जेऊरचे नाव जगाच्या पाठीवर नेले.

Archi and parsha : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या तोंडावर आलेल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तरुणाईला वेड लावणाऱ्या चित्रपटातील या ‘आर्ची’ला राज्यभरातून कार्यक्रमांसाठी आवताण येत आहेत.

गेले काही आठवडे देशभर गाजत असलेल्या ‘सैराट’ चित्रपटाने करमाळा व जेऊरचे नाव जगाच्या पाठीवर नेले. तसेच, याच परिसरातील सामान्य कलावंतांनाही जीवन जगण्याचे भाग बनविले. दिग्दर्शक नागराज मंजुळे यांची कमाल होती. त्यास पुन्हा उजाळा मिळाला. निमित्त होते जेऊर येथे ग्रामस्थांनी केलेल्या कौतुक  सोहळ्याचे. कौतुकाच्या अक्षरश: वर्षांवाने ‘सैराट’ची टिम चिंब भिजून गेली.

नागराज मंजुळे हा जागतिक पातळीवर पोहोचलेला दिग्दर्शक जेऊर गावचा. काल-परवापर्यंत तो याच गावात सामान्य जीवन जगत राहिला. ‘पिस्तुल्या’ या त्याच्या पहिल्या लघुपटाने देशभर वाहवा मिळविली होती. नंतर त्याने ‘फॅन्ड्री’ हा मराठी चित्रपट बनवून स्थानिक कलावंतांना प्रोत्साहन दिले. फॅन्ड्रीच्या यशानंतर नागराजने तयार केलेल्या ‘सैराट’ने तर कमालच केली. तब्बल शंभर कोटींपर्यंत उच्चांकी स्वरूपात उत्पन्न घेत देश-विदेशात गाजणाऱ्या ‘सैराट’च्या माध्यमातून नागराजने करमाळा, जेऊर, अकलूज येथील कलावंतांना प्रकाशात आणले. सैराटचे यश अजूनही या कलावंतांना जणू स्वप्नवतच वाटते.  जेऊरच्या एका तालमीत कुस्तीचे प्रशिक्षण घेणाऱ्या आकाश ठोसरसह (परशा), अकलूजची रिंकू राजगुरू (आर्ची), अरबाज शेख (सल्ल्या,), धनंजय ननवरे (मंग्या), तानाजी गळगुंडे (बाळ्या), सूरज पवार (प्रिन्स), सुरेश विश्वकर्मा (तात्या) अशा स्थानिक कलावंतांसह अवघ्या टिमभोवती वलय निर्माण झाले आहे. या सर्व कलावंतांचे कौतुक देश-परदेशात होत आहे. रिंकू राजगुरूला राष्ट्रपतींच्या हस्ते गौरविण्यात आले आहे. तिचा दुबईतही सन्मान झाला आहे. परंतु जेऊर येथे झालेला कौतुक सोहळा अधिक महत्त्वाचा होता.

सायंकाळी भारत महाविद्यालयाच्या प्रांगणात कौतुक सोहळा सुरू होण्यापूर्वी टिम ‘सैराट’ची शोभायात्रा काढण्यात आली. या शोभायात्रेत गावा-गावातून आलेल्या हजारो आबालवृध्दांना अक्षरश: ‘झिंग’ चढली होती. शेतकरी आपल्या डोक्यावरील फेटे उंच उडवत आनंदोत्सव साजरा करतानाचे दृश्य म्हणजे खरोखर आनंद सोहळ्याचे होते. आर्ची व परशा यांच्यासह नागराज मंजुळे, संगीतकार अजय-अतुल, तसेच इतर सर्व कलावंतांचा सत्कार करमाळ्याचे आमदार नारायण पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. हा सत्कार स्वीकारताना सर्व कलावंतांचे मन अक्षरश: भरून आले होते. यानिमित्ताने भावना आणि आनंद यांचा सुरेख संगम साधला गेला.

या वेळी सत्काराने भारावलेले संगीतकार अजय-अतुल यांच्या जोडीपैकी अतुल यांनी जेऊरकरांशी संवाद साधताना आपण आजपर्यंत अनेक चित्रपटांना संगीत दिले, परंतु ‘सैराट’ने खऱ्या अर्थाने लौकिक मिळवून दिल्याची भावना व्यक्त केली. आकाश ठोसर (परशा) व रिंकू राजगुरू (आर्ची) यांनी सैराटमधील निवडक प्रसंगावरील संवाद सादर केले. तेव्हा अनेकवेळा शिट्टय़ा व टाळ्यांनी अवघा आसमंत दुमदुमून गेला. आर्ची व परशा यांना एकमेकांच्या चिठ्ठय़ा पोहोचविणारा बालकलाकार वर्धन जावरे याने म्हटलेल्या संवादावरही तेवढय़ाच टाळ्या पडल्या.

जेऊरच्या ज्या भारत महाविद्यालयात आपण शिक्षण घेतो, त्याच महाविद्यालयाच्या प्रांगणात आपला कौतुक सोहळा होतो, याचा अधिक आनंद होतो, अशी भावना ‘परशा’ने व्यक्त केली. जेऊरमध्ये आमदार  नारायण पाटील यांच्या तालमीत कुस्तीचे धडे घेतले, तसेच याच गावचे नागराज मंजुळे यांच्याकडून अभिनयाचे धडे घ्यायला मिळाले, हे भाग्य असल्याचे त्याने नमूद केले. तर ‘आर्ची’ हिने आपला दुबईत सत्कार झाला, परंतु त्यापेक्षा अधिक आनंद जेऊरच्या सत्काराने दिला, अशी भावना व्यक्त केली. तानाजी गळगुंडे याने सैराटमुळे आपण जगाच्या पाठीवर पोहोचलो, विमान प्रवास करायला मिळाल्याचे सांगितले.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 1, 2016 2:24 am

Web Title: sairat cast and crew team visit to solapur
Next Stories
1 विद्यार्थिनीच्या लैंगिक छळाबद्दल तीव्र प्रतिक्रिया
2 शासनाच्या संकेतस्थळावर अद्याप एकनाथ खडसे मंत्रीच
3 अमोल बैस यांच्या ‘त्या’ छायाचित्राला टपाल तिकीटावर आभाळ‘माया’ लाभणार
Just Now!
X