14 October 2019

News Flash

बुलढाणा जिल्हय़ात अनधिकृत कापूस बियाण्यांची विक्री

बियाणे खरेदी करताना शेतकऱ्यांनी सावध राहण्याचे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.

(संग्रहित छायाचित्र)

..तर विक्रेत्याला पाच वर्षांच्या शिक्षेसह दंड , शेतकऱ्यांनी सावध राहण्याचे आवाहन

बुलढाणा जिल्हय़ात खरीप हंगामाच्या तोंडावर बोगस बियाणे विक्री होत आहे. चोर बीटी या नावाने सर्वत्र परिचित असलेल्या अनधिकृत कापूस बियाण्याचा व्यवसाय जिल्ह्यत मोठय़ा प्रमाणात होत असल्याचे समोर आले. विक्रेत्यांकडून शेतकऱ्यांना हे बियाणे दिले जात आहे. बोगस बियाणे विक्री करणाऱ्या विक्रेत्याला पाच वर्षांच्या शिक्षेसह दंडाचे प्रावधान आहे. बियाणे खरेदी करताना शेतकऱ्यांनी सावध राहण्याचे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.

खरीप हंगाम लागताच शेतकऱ्यांची बी बियाणे खरेदी करण्याची लगबग सुरू होते. बी बियाणे, रासायनिक खते, कीटकनाशके, तणावरची बीटी, विडगार्ड आदी निविष्ठा बाजारात उपलब्ध होतात. गेल्या चार ते पाच वर्षांपासून पिकांमध्ये तणाचे वाढते प्रमाण, मजुरांची कमतरता, मजुरीत वाढ आदी समस्या शेतकऱ्यांना मोठय़ा प्रमाणात भेडसावतात. याचा गैरफायदा घेऊन खासगी व्यक्तीकडून गावपातळीवर किंवा घरपोच बियाणे व फवारणी औषध उपलब्ध करून दिले जाते. ही बियाणे महागडय़ा दराने विक्री केली जातात. शिवाय त्या बियाण्यांच्या विक्रीवर केंद्र सरकारच्या जनुकीय तंत्रज्ञान समितीने प्रतिबंध केला आहे. अनधिकृत, बोगस व बेकायदेशीर बियाण्यांच्या पाकिटावर तंत्रज्ञान, वाण मालाच्या गुणवतेचे प्रमाण दिलेले नसते. खरेदीचीही पावती दिली जात नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची फसवणूक होण्याची दाट शक्यता असते. बंदी असलेल्या या बियाण्याची साठवणूक करणे, विक्री करणे, दुकानात बाळगणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करून दोषी आढळल्यास पाच वर्षे शिक्षा व एक लाख रुपये दंडाची तरतूद आहे.

बियाणे खरेदी करताना शेतकऱ्यांनी बियाणे पाकिटावर सरकारमान्य चिन्ह पाहावे, सरकारमान्य बोलगार्ड व बोलगार्ड-२ चिन्हासोबत दोन उभ्या गुलाबी रेषा तपासाव्यात, कापसाच्या वाणाचे नाव, क्रमांक व अंतिम मुदत तपासावी, बियाणे पाकीट सिलबंद, मोहोरबंद असल्याची खात्री करावी, कपाशीच्या बियाण्याला कोणत्या राज्यात विक्रीची परवानगी आहे, त्याची तपासणी करावी, कापूस बियाण्याचे पाकिटाचे पक्के देयक न चुकता घ्यावे, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

कृषी विभागाची नजर

खरीप हंगामात राऊंउ अप बीटी, एचटीबीटी, बीजी-३ तणावरची बीटी, विडगार्ड आदी स्वरूपाच्या कपाशीच्या बोगस बियाण्यांची विक्री होते. त्यावर कृषी विभागाची करडी नजर राहणार आहे. चोर मार्गाने या बोगस बियाण्यांची विक्री सुरू आहे.

कृषी सेवा केंद्रात बोगस व बेकायदेशीर बियाण्यांची विक्री करताना आढळल्यास शेतकऱ्यांनी १८००२३३४००० या टोल फ्री क्रमाकांवर किंवा कृषी विभाग किंवा पं.स. कार्यालयात संपर्क साधून माहिती द्यावी. संबंधितांवर कारवाई करण्यात येईल.

– नरेंद्र नाईक, जिल्हा अधीक्षक  कृषी अधिकारी, बुलढाणा.

First Published on May 16, 2019 1:11 am

Web Title: sale of unauthorized cotton seeds in buldhana district