सेलू शहरातील मुद्रांक विक्रेते चढय़ा भावाने मुद्रांक विक्री करून शेतकऱ्यांची लूट करीत आहेत. सध्या पीककर्जासाठी शेतकऱ्यांची धावपळ चालू असून त्यासाठी १०० रुपयांच्या मुद्रांकाची आवश्यकता लागते. परंतु सेलू शहरातील मुद्रांक विक्रेते हे १०० रुपयांचा मुद्रांक १२० रुपयांना राजरोसपणे विक्री करत आहेत. त्यामुळे संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी दुय्यम निबंधकांना घेराव घातला. निबंधकांनी मुद्रांक विक्रेते राजूरकर यांचे रजिस्टर, मुद्रांक आदी साहित्य जप्त करून मुद्रांक विक्रीवर तात्पुरती बंदी घातली.
अनेक परवानाधारक मुद्रांक विक्रेत्यांनी आपला परवाना बेकायदेशीररीत्या इतर दुकानदारांना वापरण्यासाठी दिला आहे. कथित दुकानदार चढय़ा भावाने मुद्रांकाची विक्री करून शेतकरी व विद्यार्थ्यांची लूट करीत आहेत. याप्रकरणी संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेत दुय्यम निबंधक गडाप्पा यांना घेराव घालून कारवाईची मागणी केली. दुय्यम निबंधकांनी प्रकरणाची गंभीरता लक्षात घेता तात्काळ या दुकानास भेट देऊन पंचनामा केला व मुद्रांक विक्रेता पी. व्ही. राजूरकर यांचा साठा रजिस्टर, विक्री रजिस्टर व मुद्रांक इत्यादी साहित्य जप्त करीत मुद्रांक विक्री करण्यावर तात्पुरती बंदी घातली. आठ दिवसांच्या आत कारवाईचे आश्वासन दिल्याने संभाजी ब्रिगेडने तात्पुरते आंदोलन मागे घेतले. तसेच आठ दिवसांत परवाना रद्द करून फौजदारी कारवाई न झाल्यास दुय्यम निबंधक कार्यालयाला कुलूप ठोकण्याचा इशारा संभाजी ब्रिगेडचे केंद्रीय कार्यकारिणी सदस्य छगन शेरे यांनी दिला आहे.