News Flash

सलीम कुरेशी हत्याकांड : सिरीयल किलर इम्रान मेहंदीसह ८ जणांना जन्मठेप

सलीम कुरेशी खून खटल्याच्या तपासादरम्यान मेहंदीच्या टोळीला मोक्का लावण्यात आला. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.

प्रतिनिधिक छायाचित्र

राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक, रॉक्सी सिनेमाचे मालक सलीम कुरेशी यांचा निर्घृण खून करणाऱ्या सिरीयल किलर इम्रान मेहंदीसह ८ जणांना जिल्हा व सत्र न्यायधीश व्ही. व्ही. पाटील यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. या खून खटल्याचा निकाल असल्यामुळे न्यायालय परिसरात तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. न्यायालयात येणाऱ्या प्रत्येकावर पोलिसांची करडी नजर होती.

राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक सलीम कुरेशी हे ५ मार्च २०१२ रोजी रात्री रॉक्सी टॉकीजकडून घरी जात असताना मध्यरात्री टाऊन हॉलजवळ त्यांची कार अडवून त्यांचे अपहरण करण्यात आले होते. दोन दिवसांनंतर सलीम कुरेशींची कार सिल्लेखान्यातील मुख्य रस्त्यावर सोडून मारेकरी निघून गेले होते. बेगमपुरा पोलीस ठाण्यात सलीम कुरेशींच्या अपहरणाचा गुन्हा दाखल झाल्यामुळे तत्कालीन सहायक पोलीस आयुक्त संदीप भाजीभाकरे यांच्या पथकाने तपासाची चक्रे फिरवली.

कारवर उडालेली लाल माती शहराच्या परिसरात कुठे आहे याचा शोध घेतला असता ती पडेगावातील कासंबरी दर्गा परिसरातील असल्याचे लक्षात आल्यामुळे तपासाला गती देत ते सलीम कुरेशींच्या हल्लेखोरांपर्यंत पोहोचले. सलीम कुरेशींचा मारेकरी इम्रान मेहंदी यास भाजीभाकरेच्या पथकाने कटकटगेट परिसरातील घरातून अटक केली.

इम्रान मेहंदी याला अटक केल्यानंतर खुनाची मालिकाच समोर आली. सलीम कुरेशी खून खटल्याच्या तपासादरम्यान मेहंदीच्या टोळीला मोक्का लावण्यात आला. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. या खून खटल्याची सुनावणी जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. व्ही. पाटील यांच्यासमोर झाली. मोक्काचे विशेष न्यायाधीश राजेंद्र मुगदिया यांनी सरकार पक्षाची बाजू मांडली. त्यानंतर न्यायालयाने इम्रान मेहंदीसह आठ जणांना दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 27, 2018 6:58 pm

Web Title: saleem qureshi assassination serial killer imran mehndi including 8 people get life imprisonment
Next Stories
1 शरद पवार यांनी सांगितला पंतप्रधान मोदींना पराभूत करण्याचा फॉर्म्युला
2 PHOTOS: कल्याण भिवंडी बायपास रोडवर धनगर समाजाचा रास्ता रोको
3 नगरसेवक हरवल्याचे पुण्यात फ्लेक्स; नागरी सुविधांकडे लक्ष नसल्याचा नागरिकांचा आरोप
Just Now!
X