‘सुलतान’ चित्रपटासंबंधीच्या एका कार्यक्रमाला अभिनेता सलमान खानने ‘बलात्कारा’विषयी केलेल्या एका वादग्रस्त विधानाने त्याला अनेकांच्या तीव्र विरोधाचा सामना करावा लागला होता. चित्रपटच्या शूटिंगसंबंधी सलमानला प्रसारमाध्यमांनी प्रश्न विचारला असता त्या प्रश्नाचे उत्तर देताना सलमानने ‘बलात्कार पिडीताला होणाऱ्या वेदनांचे’ उदाहरण देत या प्रश्नाचे उत्तर दिले होते, ज्यामुळे सलमानला अनेक क्षेत्रांतून मोठ्या प्रमाणात विरोध करण्यात आला होता. या वादाचा ‘सुलतान’ चित्रपटाच्या कमाइवर जास्त परिणाम झाला नसला तरीही त्याच्या प्रतिमेला धक्का लागला आहे असे म्हणणे वावगे ठरणार नाही. सलमानच्या या विधानाकरता त्याने रितसर माफी मागावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य महिला आयोगातर्फे करण्यात आली होती. सलमानने माफी मागण्यास नकार दिल्याचे सुत्रांकडून समजते. सलमानने लेखी उत्तर दिल्याची माहीती आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी दिली आहे. सलमानने आयोगाला दिलेल्या या उत्तराचा सारासार विचार करुन त्यानंतरच योग्य तो निर्णय आयोगाकडून घेण्यात येइल असेही विजया रहाटकर म्हणाल्या.
सलमानच्या या विवादास्पद विधानाप्रकरणी राष्ट्रीय महिला आयोगानेही त्याला न्यायालयाचे समन्स पाठवले होते. काही दिवसांपूर्वी सलमानला या प्रकरणी आयोगासमोर सादर व्हायचे होते, पण तसे झाले नाही. त्यामुळे आता आयोगातर्फे तिसरे आणि शेवटचे समन पाठवण्यात आले आहे. आता या संबंधी अभिनेता सलमान खान काय भूमिका घेणार याकडेच साऱ्यांचे लक्ष लागून राहीले आहे.