महाराष्ट्रात गेल्या वर्षी झालेल्या अतिवृष्टीचा कोल्हापूर जिल्ह्याला मोठा फटका बसला होता. इथली अनेक गावंच्या गावं पाण्याखाली गेली होती. या पुरामुळे बाधीत झालेल्यांच्या मदतीसाठी आता प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता सलमान खान धाऊन आला आहे. त्यानं जिल्ह्यातील खिद्रापूर हे गाव दत्तक घेतलं असून या ठिकाणच्या पुरग्रस्तांना तो पक्की घरं बांधून देणार आहे.

सलमान खानची चित्रपट निर्मिती संस्था ‘सलमान खान फिल्मस्’ आणि गुरुग्राम येथील ‘एलान फाऊंडेशन’ या दोन संस्थांनी मिळून खिद्रापूर गाव दत्तक घेतले आहे. या संस्था येथील पुरात वाहून गेलेली घर पुन्हा बांधून देणार आहेत. राज्य सरकार आणि गुंतवणूकदारांच्या सहकार्याने ही कामं करण्यात येणार आहेत.

याप्रकरणी बोलताना एलान फाऊंडेशनचे संचालक रवीश कपूर म्हणाले, “एक जबाबदार संस्था म्हणून भारताच्या ग्रामीण भागात सकारात्मक बदल घडवून आणण्यास आम्ही कटिबद्ध आहोत. इथल्या अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या विकासासाठी आमचा हा छोटासा प्रयत्न आहे. सलमान खान यांनी या कामात आम्हाला सहकार्य केल्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो”

“गेल्या वर्षी महाराष्ट्रातील पुरामध्ये ज्यांनी आपलं कुटुंब गमावलं त्यांच्यासोबत माझ्या संवेदना आहेत. या पुरामध्ये अनेकांनी आपली घरं गमावली आहेत. त्यामुळे ही घरं पुन्हा उभारून देत त्यांना उभं करण्याचा आमचा प्रयत्न आहे,” असं सलमान खान यानं म्हटलं आहे.

या योजनेसाठी कोल्हापूर जिल्हा परिषद आणि महाराष्ट्र शासन यांच्यासोबत एलान फाऊंडेशनने करारही केला आहे. या कामाचा आढावा घेण्यासाठी महाराष्ट्र शासनाने सात सदस्यीय समितीचीही स्थापना केली आहे.