तंत्रज्ञानतज्ज्ञ सॅम पित्रोदा यांचे निरीक्षण

परदेशातील भारतीयांना संस्कृतिरक्षण, रूढी आणि परंपरांचे जतन महत्त्वाचे वाटत असल्याने ते भाजपशी जोडले गेले, असे मत काँग्रेसच्या विदेशी विभागाचे प्रमुख आणि ज्येष्ठ तंत्रज्ञान तज्ज्ञ सॅम पित्रोदा यांनी शनिवारी येथे व्यक्त केले.

प्रेस क्लबमध्ये पत्रकारांशी बोलताना पित्रोदा यांनी काही मुद्दय़ांवर विवेचन केले. अमेरिकेत आज लक्षावधी भारतीय आहेत. शिकागोचे उदाहरण घेतले, तर तेथे काही वर्षांपूर्वी केवळ ५०० भारतीय होते, आजही संख्या तीन लाखांवर गेली आहे. त्यांना लक्षावधी डॉलर्स वेतन मिळत आहे. १९६५मध्ये शिकागोमध्ये एकही मंदिर नव्हते आणि आज ३० हून अधिक मंदिरे आहेत. तेथे हे भारतीय पूजा, होमहवन करतात. तेथील भारतीयांना आपल्या संस्कृतिरक्षणाचे महत्त्व खूप असून त्यातून ते भाजपशी जोडले गेले असावेत, असे पित्रोदा यांनी सांगितले.

काँग्रेसच्या जाहीरनाम्यात दिलेल्या आश्वासनांबद्दल बोलताना पित्रोदा यांनी आश्वासने निश्चितपणे पूर्ण करता येतील, आम्ही रोजगार हमी योजनेची उद्दिष्टे साध्य केली होती, असे स्पष्ट केले. पुलवामा हल्ल्याबाबत व्यक्त केलेली मते ही माझी वैयक्तिक  होती. त्याचा काँग्रेसवर कोणताही परिणाम होणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.