News Flash

सटवाजीराव डफळे यांची समाधी प्रकाशात

या कार्यक्रमात समाधीभोवती असणारी झाडेझुडपे काढण्यात आली आणि परिसर स्वच्छ करण्यात आला.

नव्याने प्रकाशात आलेली शिवशाहीतील योद्धे सटवोजीराव डफळे यांची डफळापूर ता. जत येथील समाधी.

सांगली : शिवकालीन प्रसिद्ध सरदार आणि जत जहागिरीचे मूळ संस्थापक सटवाजीराव डफळे यांची डफळापूर येथील समाधी प्रकाशात आली आहे. उमराणीचे जहागीरदार अमरसिंहराजे डफळे यांच्या प्रयत्नातून आणि इतिहास अभ्यासक मानसिंगराव कुमठेकर यांच्या अभ्यासातून या शूर योद्धय़ाच्या स्मृतिस्थळाला उजाळा मिळाला आहे. या समाधिस्थळाचा जीर्णोद्धार करण्याचा संकल्प डफळे आणि गायकवाड कुटुंबीयांनी केला आहे.

शिवकालीन प्रसिद्ध योद्धे सटवाजीराव डफळे यांची समाधी डफळापूर येथील सुभाषराव गायकवाड यांच्या शेतात असल्याची माहिती उमराणीचे जहागीरदार अमरसिंह डफळे यांना मिळाली होती. त्यांनी प्रत्यक्ष जागेची पाहणी करून माहिती घेतली. मिरज इतिहास संशोधन मंडळाचे इतिहास अभ्यासक मानसिंगराव कुमठेकर यांनी या समाधिस्थळाचा अभ्यास केला. त्यांची बांधकाम शैली आणि भव्यता पाहून ही प्रसिद्ध पुरुषाचीच समाधी असल्याचा निर्वाळा दिला. घराण्यातील अन्य व्यक्तींचा अभ्यास केला असता ही समाधी सटवाजीराव डफळे यांचीच असल्याची खात्री झाली.

डफळापूर गावात प्रवेश करताना सुभाषराव गायकवाड यांच्या शेतात ही समाधी आहे. गायकवाड घराणे हे डफळे घराण्याचे नजीकचे आप्त असल्याने त्यांनी आजवर या समाधीचे जतन करून ठेवले होते. या समाधीचा जीर्णोद्धार करण्याची कल्पना डफळे आणि गायकवाड कुटुंबीयांनी मांडली. त्यानुसार एका छोटेखानी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

या कार्यक्रमात समाधीभोवती असणारी झाडेझुडपे काढण्यात आली आणि परिसर स्वच्छ करण्यात आला. अमरसिंह डफळे, सुभाषराव गायकवाड, रमेश गायकवाड, सुरेशराव डफळे, विक्रमसिंह डफळे, बाळासाहेब  गायकवाड, धर्यशीलराव डफळे, संग्रामसिंह डफळे, राहुल डफळे, खर्डेकर सरकार, अमरसिंह इंगोले, बाप्पासाहेब डफळे, जयवंतराव डफळे, मोहनराव गायकवाड, रमेश शिंदे, वसंतराव चव्हाण, परशुराम चव्हाण यांच्यासह डफळापूर येथील ग्रामस्थ उपस्थित होते. गायकवाड कुटुंबीयांनी ही समाधी जतन करून ठेवल्याबद्दल अमरसिंह डफळे यांनी कृतज्ञता व्यक्त केली.

सटवोजीराव डफळे हे पराक्रमी योद्धे होते. आदिलशाहने त्यांना जत, करजगी, होनवाड, बारडोल या चार गावांचे देशमुखी वतन दिले होते. त्या काळातील अनेक लढायांत त्यांनी पराक्रम गाजवला. पुढे मोगल काळातही त्यांना नवी वतने मिळाली. सरसेनापती संताजी घोरपडे यांच्या नेतृत्वाखाली ही त्यांनी काही लढायांत मर्दुमकी गाजवली. सन १७०६ मध्ये त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर त्यांची समाधी त्यांचे वास्तव्याचे ठिकाण असलेल्या डफळापूर गावी बांधण्यात आली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 18, 2018 3:30 am

Web Title: samadhi of sardar satvajirao duffle found in duffalapur
Next Stories
1 सांगलीच्या ऊर्वी पाटीलकडून सरपास शिखरावर तिरंगा
2 एचआयव्हीबाधित विद्यार्थ्यांनाही ‘आरटीई’मध्ये प्रवेश
3 अभियंत्यांपाठोपाठ शिक्षकही बेरोजगार
Just Now!
X