गेल्या काही दिवसांपासून विधानसभेत वेगळ्या विदर्भाच्या मागणीवरून नेते आक्रमक झाले होते. स्वतंत्र विदर्भाची मागणी करणाऱ्या भाजप नेत्यांना शिवसेनेने फटकारले आहे. शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र हा अखंड राहिल आणि जो कोणी अंगावर येईल त्याला शिंगावर घेऊन आपटू, असा इशारा शिवसेनेने दिला आहे. वेगळ्या विदर्भाची मागणी करणारे नेते हे मुख्यमंत्र्यांना अस्थिर करण्याचे कारस्थान रचत आहेत, असा आरोप शिवसेनेचे मुखपत्र ‘सामना’तील अग्रलेखातून करण्यात आला.
अग्रलेखात म्हटले आहे की, ‘योग्य वेळी विदर्भ वेगळा करू’, असे भाजपचे ‘प्रांतिक’ अध्यक्ष सांगतात. पण, योग्य वेळी बेळगाव-कारवारसह मराठी भाग महाराष्ट्रात आणून दाखवूच अशी गर्जना त्यांनी केली असती तर महाराष्ट्राशी इमान राखले असते असे म्हणता आले असते. पण, आता वेगळ्या विदर्भाची मागणी करण्याचे हे प्रयत्न अंगलगट आल्याशिवाय राहणार नाही’ अशा शब्दांत  भाजप नेत्यांना फटकारण्यात आले आहे. ‘शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र अखंड राहील. जे अंगावर येतील त्यांना शिंगावर घेऊन आपटल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही अग्रलेखातून देण्यात आला आहे. ‘आम्ही अखंड महाराष्ट्राचे व अखंड महाराष्ट्र आमचा’ हे नाते अतूट आहे असा नारा अग्रलेखातून देण्यात आला. वेगळ्या विदर्भाची मागणी करणारे नेते हे मुख्यमंत्र्यांना अस्थिर व अस्वस्थ करण्याचे कारस्थान रचत आहे आणि त्यासाठी विदर्भ मुद्द्याचा फुसका आपटीबार फोडून बोंबाबोंब तर केली जात नाही ना? असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे. कोणीही कितीही कारस्थाने रचली तरी जोपर्यंत शिवसेना आहे तोपर्यंत महाराष्ट्राचा एक कपचाही उडवला जाणार नाही असा इशारा देण्यात आला आहे. भाजपाची भूमिका ही महाराष्ट्रवादी असली तर या भूमिकेचे स्वागच आहे पण जर महाराष्ट्रविरोधी भूमिका दिसली तर राजकीय भूमिकांचे ओझे आपण फेकून देऊ, असा इशाराही अग्रलेखातून देण्यात आला आहे