‘गेल्या दोनेक वर्षांतच हे गोरक्षक मोठ्या संख्येने कसे काय निर्माण झाले?’ असा जळजळीत सवाल शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’च्या अग्रलेखातून शिवसेनेने विचारला आहे. गेल्या काही महिन्यांपासून गोहत्येच्या नावाखाली तथाकथित गोरक्षकांकडून दलित आणि मुसलमानांवर जे हल्ले होत त्यावर अखेर पंतप्रधानांनी मौन सोडले. पंतप्रधांनी जरी या तथाकथित गोरक्षकांवर सडकून टीका केली असली, तरी काँग्रेस राजवटीत काहीच सर्वोदयवादी कार्यकर्ते गोरक्षेसाठी आंदोलन करीत होते, पण त्यांचा आवाज इतका क्षीण होता की, राज्यकर्त्यांच्या कानाचे पडदे फाटून ‘गोवंश’ हत्याबंदीचा कायदा होण्याची शक्यता अजिबात नव्हती मग आता गेल्या दोनेक वर्षांतच हे गोरक्षक मोठ्या संख्येने कसे काय निर्माण झाले? असा थेट सवाल विचारत गोरक्षकांच्या मोदींच्या भूमिकेवर शिवसेनेने अप्रत्यक्षरित्या प्रश्नचिन्ह उभे केले.

‘पंतप्रधान मोदी यांनी गोहत्या प्रकरणी मनाचे दार उघडले असून ते स्वयंभू गोरक्षकांवर भलतेच उखडले आहेत. गोरक्षणाच्या नावाखाली ८० टक्के लोक गोरखधंदा म्हणजे गुंडगिरीच करीत आहेत, असा आरोप त्यांनी केला याचवेळी राज्य सरकारांनी अशा संघटनांची यादी बनवावी व त्यांच्यावर कठोर कारवाई करावी असे आदेशही दिले त्यामुळे हिंदुत्ववादी संस्था, संघटनांची पंचाईत झाली.’ मोदींच्या या भूमिकेचे कोडकौतुक ‘सामना’तून केले पण त्याचवेळी ‘भारतीय जनता पक्षाच्या प्रचाराचा झेंडा घेऊन ज्या संस्था व संघटना पुढे आल्या त्यात गोरक्षा मंडळींच्या शेकडो संस्था होत्या व हेच लोक आज गोरक्षणाचा गोरखधंदा करतात असे सरकारला वाटते काय?’ असा सवाल अग्रलेखातून विचारला आहे.
जसे मोदींनी गोहत्या आणि तथाकथिक गोरक्षकांनकडून होणा-या मारहाणीवर मौन सोडले तसे मुंबईतल्या शाकाहाऱ्यांच्या दादागिरीवर लक्ष द्या, असा टोलाही हाणला आहे. ‘मुंबईसारख्या शहरात ‘शाकाहारा’च्या नावाखाली अनेक बिल्डरांनी स्वत:ची वेगळी बेटे निर्माण करून मांसाहार करणार्‍यांना घरे नाकारण्याचे उद्योग चालवले आहेत  या शाकाहारवाद्यांवरही कठोर प्रहार करून त्यांना वठणीवर आणा’ असा सल्लाही शिवसेनेने आपल्या मित्रपक्षाला दिला आहे.