भीमा-कोरेगाव घटनेसंदर्भात शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष संभाजी भिडे गुरूजी, मिलिंद एकबोटे यांच्यावर दाखल केलेल खोटे गुन्हे मागे घेण्याच्या मागणीसाठी संघटनेच्या नगर शहरातील शाखेच्या पुढाकारातून विविध हिंदुत्ववादी संघटनांनी आज, शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा नेला. मोर्चेकऱ्यांनी काळ्या फिती लावल्या होत्या. शिष्टमंडळाने विविध मागण्यांचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित यांना दिले.

बापू ठाणगे, ॠषभ भादिया, देवीदास मुदगल, तान्हाजी देवकर, सागर ठोंबरे, बापूसाहेब गवळी, अ‍ॅड. महेश शेडाळे, भाऊसाहेब हिंगे, किशोर दरेकर, विनोद काशीद आदींनी आंदोलनाचे नेतृत्व केले. बसस्थामनकाजवळील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून मोर्चाला सुरुवात करण्यात आली. प्रमुख मार्गावरुन तो जिल्हाधिकारी कार्यालयावर नेण्यात आला. तेथे आंदोलकांनी ठिय्या दिला.

भीमा कोरेगाव घटनेत संभाजी भिडे यांचा कोणताही संबंध नसताना त्यांचे नाव यात गोवण्यात आले आहे, खोटा गुन्हा नोंदविण्यात आला आहे, यामागे काही समाजविघातक प्रवृत्ती असून, यासाठी आíथक देवाण-घेवाण झाली असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. शिवप्रतिष्ठान व हिंदुस्थान संघटनेचे कार्य दिवसेंदिवस राज्यात वाढत आहे. काही असंतुष्ट जातीयवादी शक्तींना हे बघवत नाही. त्यामुळे राजकीय हेतूने भीमा कोरेगाव घटनेत संभाजी भिडे गुरूजी व मिलिंद एकबोटे यांचे नाव गोवले गेले आहे. घटना घडली तेव्हा भिडे गुरूजी व एकबोटे हे तेथे नव्हते, आमदार जयंत पाटील यांच्याकडे  गेले होते.