करोनाचा संसर्ग होणाऱ्या नागरिकांविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी राज्याचे जलसंधारण मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी संभाजी भिडे यांचा समाचार घेतला. “करोनाच्या संकट काळात राज्य सरकार आणि समाज एकत्रित येऊन प्रयत्न करत असताना दिशाभूल करणारी वक्तव्यं करणं अयोग्य आहे. अशी वक्तव्यं खपवून घेतली जाणार नाहीत. अशा प्रकरणात तपासणी करुन आवश्यकता वाटल्यास वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल,” असं सांगत जयंत पाटील यांनी संभाजी भिडे यांना इशारा दिला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सांगली येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत जयंत पाटील बोलत होते. यावेळी त्यांनी संभाजी भिडे यांनी केलेल्या विधानावरही भाष्य केलं. “करोना संकटकाळात समाजात गैरसमज करणारी वक्तव्यं खपवून घेतली जाणार नाहीत. सध्या अनेकांना करोनाची बाधी झाली आहे. एवढ्या मोठ्या संकटाच्या काळात अशाप्रकारची वक्तव्य करुन लोकांची दिशाभूल केली जात आहे. हे अयोग्य आहे. सध्या राज्य सरकार आणि समाज करोनाच्या संकटाचा सामना करत आहे. अशावेळी आंबे खाल्ल्यावर मुलं होतात, अशा प्रवृत्तीच्या लोकांकडून गैरसमज करणारी विधानं होत असतील, तर ते अयोग्य आहे,” असं पाटील म्हणाले.

“एरवी अशी वक्तव्यं खपून जातात. पण सध्याच्या परिस्थितीत अशा वक्तव्यांमुळे त्या संकटाचं गांभीर्य कमी होतं. कोणीही उठून काहीही बोलायला लागलं तर सरकार आणि समाजाकडून सुरु असणाऱ्या प्रयत्नांमध्ये बाधा निर्माण होईल. त्यामुळे अशी वक्तव्यं कायद्याच्यादृष्टीने तपासून त्यांच्यावर योग्य कारवाई झाली पाहिजे. संभाजी भिडे पुन्हा अशाप्रकारचं धाडसी विधान करणार नाहीत,” असंही पाटील यांनी म्हटलं आहे.

संभाजी भिडे काय म्हणाले होते?

“मुळात करोना हा रोग नाही. करोनानं माणसं मरतात ती जगण्याच्या लायकीची नाहीत. करोना हा रोग नाही. हा ** वृत्तीच्या लोकांना होणारा रोग आहे. मानसिक रोग आहे. यामुळे काही होत नाही. दारुची दुकानं उघडी …त्यांना परवानगी दिली आहे. पण कोणी काही विकत बसला आहे, त्याला पोलीस काठ्या मारतात. काय चावटपणा चालला आहे. हा नालायकपणा, मूर्खपणा चालला आहे. लोकांनी बंड करुन उठलं पाहिजे. असलं हे शासन फेकून दिलं पाहिजे. अजिबात उपयोगाचं नाही,” असं संभाजी भिडे म्हणाले होते.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sambhaji bhide over controversial statement ncp leader jayant patil sambhaji bhide statement about corona bmh
First published on: 11-04-2021 at 16:00 IST