शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या वक्तव्याविरोधात शिवप्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी भिडे (Sambhaji Bhide) यांनी सांगली बंदची हाक दिली आहे. यानिमित्ताने समर्थकांशी संवाद साधताना त्यांनी उदयनराजेंचा अपमान सहन करु शकत नाही असं सांगत संजय राऊत यांना पदावरुन दूर करा अशी मागणी केली. वागताना बोलताना तारतम्य बाळगावं असा टोलाही यावेळी त्यांनी लगावला.

“सांगली बंद शिवसेनेविरोधात नसून छत्रपती परंपरेचा अवमान करणाऱ्या संजय राऊत यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी आहे. देशाला शिवसेनेच्या विचारांची नितांत गरज आहे,” असं संभाजी भिडे यांनी यावेळी सांगितलं. छत्रपतींच्या परंपरेचा अपमान करणं तसंच उदयनराजेंविरोधातील वक्तव्याचा संताप व्यक्त करण्यासाठी हा बंद पुकारला असल्याचं संभाजी भिडे यांनी सांगितलं. “हा बंद कोणत्याही पक्षाविरोधात नाही. पूर्ण देशावर शिवसेनेचं राज्य असावं इतका त्यांच्याबद्दल आदर आहे. पण जर शिवसेनेतील कोणी इतकं बेताल वक्तव्य करत असेल तर उद्धव ठाकरे यांनी त्यांना बाजूला करावं. समाजाचं स्वास्थ बिघडवू नये,” अशी मागणी संभाजी भिडे यांनी यावेळी केली.

“संजय राऊत असो किंवा गोयल असो, शिवरायांच्या परंपरेला कलंक लागेल असं वागलेलं चालणार नाही. संजय राऊत यांनी ठिणगीला पाय लावला आहे. ते त्या स्थानावर राहता कामा नये. संजय राऊत यांना पदावरुन दूर करा अशी माझी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना हात जोडून विनंती आहे,” असं संभाजी भिडे यांनी म्हटलं आहे.

आणखी वाचा – उदयनराजेंनी शिवरायांचे वंशज असल्याचे पुरावे आणावेत – संजय राऊत

तसंच बंद असताना कोणत्याही प्रकारची हिंसा केली जाऊ नये असं आवाहन यावेळी त्यांनी केलं. देशाने आदर्श घ्यावा असं बंद पाळला पाहिजे असं संभाजी भिडे यांनी यावेळी सांगितलं. नरेंद्र मोदींची छत्रपतींशी तुलना चुकीचीच असल्याचंही यावेळी ते म्हणाले.