संजय राऊत (Sanjay Raut ) यांनी उदयनराजे भोसले यांच्यासंबंधी केलेल्या वक्तव्याविरोधात शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे (Sambhaji Bhide) यांनी सांगली बंदची हाक दिली आहे. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी संजय राऊत यांच्यावर टीका करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे त्यांना तात्काळ पदावरुन हटवलं पाहिजे अशी मागणी केली. संजय राऊत यांनी उदयनराजे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आहेत याचे पुरावे द्यावे असं म्हटलं होतं. याच वक्तव्याचा निषेध नोंदवण्यासाठी उद्या शिवप्रतिष्ठानतर्फे सांगली बंद पुकारण्यात आला आहे.

संभाजी भिडे यांनी उदयनराजेंचा अपमान सहन करु शकत नाही असं सांगत संजय राऊत यांना पदावरुन दूर करा अशी मागणी उद्धव ठाकरे यांच्याकडे केली. वागताना बोलताना तारतम्य बाळगावं असा टोलाही यावेळी त्यांनी लगावला. “संजय राऊत असो किंवा गोयल असो, शिवरायांच्या परंपरेला कलंक लागेल असं वागलेलं चालणार नाही. संजय राऊत यांनी ठिणगीला पाय लावला आहे. ते त्या स्थानावर राहता कामा नये. संजय राऊत यांना पदावरुन दूर करा अशी माझी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना हात जोडून विनंती आहे,” असं संभाजी भिडे यांनी म्हटलं आहे.

आणखी वाचा – उदयनराजेंचा अपमान सहन करु शकत नाही – संभाजी भिडे

बंद शिवसेनेविरोधात नाही
“हा बंद कोणत्याही पक्षाविरोधात नाही. पूर्ण देशावर शिवसेनेचं राज्य असावं इतका त्यांच्याबद्दल आदर आहे. पण जर शिवसेनेतील कोणी इतकं बेताल वक्तव्य करत असेल तर उद्धव ठाकरे यांनी त्यांना बाजूला करावं. समाजाचं स्वास्थ बिघडवू नये,” असं संभाजी भिडे यांनी म्हटलं.

देशाने आदर्श घ्यावा असं बंद पाळला पाहिजे
तसंच बंद असताना कोणत्याही प्रकारची हिंसा केली जाऊ नये असं आवाहन यावेळी त्यांनी केलं. देशाने आदर्श घ्यावा असं बंद पाळला पाहिजे असं संभाजी भिडे यांनी यावेळी सांगितलं. नरेंद्र मोदींची छत्रपतींशी तुलना चुकीचीच असल्याचंही यावेळी ते म्हणाले.