विशिष्ट आंबा खाल्ला की पुत्रप्ताप्ती होते, संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांच्यापेक्षा मनू श्रेष्ठ होता,अशाप्रकारची विविध वादग्रस्त विधानं करुन सतत चर्चेत असणारे श्री शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी आणखी एक वादग्रस्त विधान केलं आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृती वाचून राज्यघटना लिहिली, असं विधान संभाजी भिडे यांनी केलं आहे. संभाजी भिडेंच्या या विधानामुळे नवा वाद सुरू होण्याची शक्यता आहे.

‘न्यूज 18 लोकमत’च्या एका कार्यक्रमात बोलताना भिडे म्हणाले, ”डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी मनूचं कौतुक केलं होतं हा इतिहास आहे. राजस्थान विधानसभेच्या भवनाबाहेर मनूचा पुतळा उभा करण्यासाठी पहिले राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर गेले होते. मनूचा जो पुतळा उभा करण्यात आला होता, त्या पुतळ्याखाली “मनू हा जगातला पहिला कायदेपंडित होता” असं बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वतः लिहिलं असा दावा भिडेंनी केला. तसंच संविधान देशासाठी अर्पण करताना, मी हे लिहिलं मनुस्मृतीचा अभ्यास करून लिहिलं असंही बाबासाहेब म्हणाले होते असा दावाही भिडेंनी केला आहे. याशिवाय याचा पुरावाही मिळेल तो मीडियाने शोधून काढावा” असं भिडे म्हणाले. मनुने विश्वाच्या कल्याणासाठी ग्रंथ लिहिला. जपान सारखे राष्ट्र मनूला मानतं अनेक विदेशातील विद्यापीठात मनुस्मृतीचा अभ्यास करतात असा दावाही त्यांनी केला.

या कार्यक्रमात बोलताना भिडे यांनी कोरेगाव-भिमा दंगलीवरही भाष्य केलं आणि मिलिंद एकबोटेंचं समर्थन करत संभाजी ब्रिगेडनेच ही दंगल पेटवली होती, अशी टीकाही केली. याशिवाय, तो विशिष्ट आंबा खाल्ला की माणसाची पौरूष शक्ती वाढते आणि त्यामुळे पुत्रप्ताप्ती होते या विधानावरही संभाजी भिडे गुरूजी ठाम राहिले, गरज पडली तर कोर्टात पुराव्यानिशी आपला दावा सिद्ध करेन असंही ते म्हणाले.