महिन्याभर सुरु असणाऱ्या राजकीय गोंधळानंतर अखेर २८ नोव्हेंबर रोजी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आणि राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने एकत्रित सरकार स्थापन केलं. मात्र त्यानंतर भाजपाच्या राज्यातील तसेच केंद्रातील नेत्यांनी शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर जाण्याच्या निर्णयावरुन टीकेची झोड उठवली आहे. खास करुन सोशल नेटवर्किंग साईटवरुन अनेक नेत्यांनी यासंदर्भात आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी बाळासाहेबांचा एक जुना व्हिडिओ शेअर करत शिवसेनेवर निशाणा साधला आहे.

पात्रा यांनी ट्विटवरुन बाळासाहेबांच्या एका मुलाखतीचा व्हिडिओ शेअर केला आहे. २००४ साली बाळासाहेबांनी दिलेल्या या मुलाखतीमध्ये त्यांनी काँग्रेसवर टीका केली होती. याच मुलाखतीमध्ये बाळासाहेबांनी केलेल्या काँग्रेसविरोधी वक्तव्याची शिवसेनेला आठवण करुन दिली आहे. हा व्हिडिओ शेअर करताना पात्रांनी बाळासाहेबांनी उच्चारलेले वाक्य कॅप्शन म्हणून पोस्ट केले आहे. “मी माझ्या शिवसेनेची काँग्रेस कधीच होऊ देणार नाही. मला जेव्हा कळेल की शिवसेना काँग्रेस झाली आहे. तर मी माझं दुकान बंद करेन असं बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते. मात्र आता राहुल गांधीच शिवसेनेचं दुकान बंद करतील असं वाटतंय,” असा टोला पात्रांनी लगावला आहे.

या व्हिडिओमधील मुलाखतीमध्ये बाळासाहेबांनी नारायण राणेंवर टीका करताना काँग्रेसलाही लक्ष्य केलं होतं. “मी माझ्या शिवसेनेची काँग्रेस कधीच होऊ देणार नाही. मला जेव्हा कळेल की शिवसेना काँग्रेस झाली आहे. तर मी माझं दुकाण बंद करेन. मी निवडणूकच लढणार नाही. लोकं कुठे जातील मग. सध्या तुम्हाला (नारायण राणेंना) मिळत असणारे प्रेम, मान-सन्मान हे शिवसेनेमुळेच मिळत आहे. हिंदुत्वामुळे मिळत आहे,” असं म्हटलं आहे.

या व्हिडिओला दोन दिवसांमध्ये ११ हजारहून अधिक जणांनी रिट्विट केले असून ३६ हजारच्या आसपास लाईक्स या व्हिडिओला आहेत.