सफाळ्यात देशातील पहिला प्रकल्प असल्याचा ‘आयआयटी’ दावा

नीरज राऊत, लोकसत्ता

पालघर : कमी खर्चात संपूर्ण गावाला समदबाने पाणीपुरवठा करण्याचे तसेच अत्यंत कमी जागेत उभी राहणारी पाणी वितरण व्यवस्था सफाळे उंबरपाडा या पालघर तालुक्यातील गावात कार्यान्वित झाली आहे. देशात अशा प्रकारचा हा पहिलाच प्रकल्प असल्याचा दावा मुंबईच्या ‘आयआयटी’ने केला आहे.

५० हजार ते एक लाख लिटर क्षमतेच्या पाणीपुरवठा व्यवस्थेतील पाण्याची टाकी उभारण्यासाठी सर्व साधारणपणे  १० ते २० लाख रुपयांचा खर्च येत असतो. मात्र वितरण व्यवस्थेत समदाब निर्माण करून पाणी पुरवठा करण्यासाठी ‘शाफ्ट’ ही दोन पाईपमधली व्यवस्था निर्माण करण्यात आली आहे. पूर्वीच्या काळामध्ये वापरल्या जाणाऱ्या ‘खांब’ या तंत्रज्ञानाचे आयआयटी, मुंबईच्या शहरी विज्ञान व अभियांत्रिकी विभागाचे अभियंते व मार्गदर्शक प्रा. प्रदीप काळबर यांनी सफाळे येथे ही व्यवस्था अंमलात आणली आहे.

पाण्याला पुरेसा दाब मिळण्यासाठी पाण्याची टाकी उभारण्याची संकल्पना गेल्या काही वर्षांंपासून आहे. मात्र या टाक्यांमध्ये कालांतराने होणारी गळती व इतर तांत्रिक अडचणी येत असतात.  खांबाच्या आकाराचा शाफ्ट कमी खर्चात उभारून सर्व वाहिन्यांवर समदाब निर्माण करण्याची क्षमता असलेले तंत्रज्ञान देशात पूर्वापार वापरले जायचे.  त्याचे अनुकरण व प्रात्यक्षिक सफाळे येथे करण्यात आले आहे. या तंत्रज्ञानाचा सर्व ग्रामीण नळपणी योजनांमध्ये वापर करावा असे केंद्रीय पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्या संचालकाने राज्याच्या प्रधान सचिवांना पत्राद्वारे कळवले आहे. पाणीपुरवठा क्षेत्रामध्ये नवनवीन तंत्रज्ञान शोधण्यासाठी परदेशी वाऱ्या करणाऱ्या मंडळींना देशांतर्गत उपलब्ध असलेल्या या तंत्रज्ञानाचा प्रसार करण्याची आता खऱ्या अर्थाने गरज आहे, हे या प्रकल्पाने दाखवून दिले आहे.

बंद पडलेल्या योजनांना संजीवनी देणारे तंत्रज्ञान

सुमारे दोन लाख रुपये खर्चून उभारलेल्या या पहिल्या शाफ्टमुळे सफाळे डोंगरी भागातील पाच हजारांहून अधिक नागरिकांना याचा लाभ होणार आहे. विशेष म्हणजे अत्यंत साध्या तंत्रज्ञानावर हा प्रकल्प आधारित असून त्याचे सर्व तांत्रिकता व उभारणी सफाळे येथील तंत्रज्ज्ञ व सफाळ्यातील नागरिकांच्या मदतीने झाली आहे.  तीन जलवाहिन्यांना शाफ्ट, मनिफॉल्ड व मास्टरपीस अशी उपकरणे बसवण्याचे काम सुरू आहे.  त्याचे अनुकरण वेगवेगळ्या ठिकाणी केल्यास अत्यंत कमी खर्चात पाणीपुरवठा व्यवस्था उभारली जाऊ शकते तसेच बंद पडलेल्या पाणीपुरवठा योजनांना संजीवनी मिळू शकेल, असा दावा करण्यात येतो.

पिण्याचे पाणी व पाण्याचा पुनर्वापर

घरगुती वापरासाठी लागणाऱ्या पाण्यापैकी चार ते सहा लिटर पाणी प्रत्येक व्यक्तीला पिण्यासाठी   तसेच जेवणासाठी लागत असते. घरगुती वापराला लागेल तितके पाण्याचे शुद्धीकरण करून ते कमी दरात उपलब्ध करून देण्याचा प्रकल्प सफाळे ग्रामपंचायत अनेक वर्षांंपासून राबवत आहे.  २० लिटरच्या पाण्याच्या बाटल्या अवघ्या दहा रुपयात गावातील रहिवाशांना मिळत  आहे. त्याच पद्धतीने सांडपाण्यावर प्रक्रिया करून पाण्याचा पुनर्वापर करण्याची प्रकल्पही सफाळे ग्रामपंचायतीने हाती घेतला आहे.  या कमी खर्चातील प्रभावी तंत्रज्ञानाचा जिल्ह्यत अधिकाधिक प्रसार व्हावा यासाठी आपण प्रयत्न करत असल्याचे आयआयटीचे प्रा. प्रदीप काळबर यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले.