समृध्दी महामार्गावरून राजकीय वाद रंगला असतानाच हा महामार्ग आता कौटुंबिक कलहासाठीही कारणीभूत ठरु लागल्याचे दिसते. इगतपुरी तालुक्यात एका महिलेची तिच्या भावांनीच १८ लाख रुपयांनी फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी महिलेने इगतपुरी पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे.

ठाण्यातील उल्हासनगर भागात राहणाऱ्या छबाबाई गवळे आणि त्यांचे इगतपुरीत राहणारे भाऊ सजन पगारे, शरद पगारे, महेंद्र पगारे, भास्कर पगारे यांची धामणी गावातील एकत्रित जमीन समृध्दी महामार्गालगत संपादित करण्यात आली. त्यासाठी एक कोटी नऊ लाख ८१ हजार ४३४ रुपयांचा शासकीय मोबदला देण्याचे ठरले. या मोबदल्यात छबाबाई यांचा हिस्सा आहे.

भावांनी छबाबाई यांना हिस्सा देण्याची तयारी दर्शवली. हा हिस्सा देण्याचे सांगत त्यांच्या भावाने इगतपुरी येथील दुय्यम निबंधक कार्यालयात छबाबाई यांना आणले. त्यांच्या अज्ञानाचा फायदा घेत समृध्दी महामार्गाकरीता खरेदी खत लिहून घेतो, असे सांगून त्यांचे अंगठे घेतले. पैसे जमा होताच १८ लाख रुपये देण्याचे आश्वासन छबाबाई यांना देण्यात आले. संशयिताच्या नावावर एक कोटी नऊ लाख रुपयांहून अधिक रक्कम जमा होऊनही संशयितांनी छबाबाई यांना १८ लाख रुपये दिले नसल्याचा आरोप छबाबाई यांनी केला आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाच्या थेट जमीन खरेदीत नाशिक जिल्ह्यात कौटुंबिक वाद, न्यायालयीन दावे, कुळाचे वाद अडसर ठरत असल्याचे दिसते.