हिंगोलीत गुन्हा दाखल

हिंगोली : कळमनुरीचे उपविभागीय अधिकारी प्रशांत खेडेकर हे आपल्या पथकासह हिंगोलीतील खटकाळी हनुमान बायपास येथे थांबले असता खानापूरकडून येणाऱ्या वाळूची अवैध वाहतूक करणारे ट्रॅक्टर त्यांनी पकडले. तेवढय़ात ट्रॅक्टरमालकाने खेडेकर यांना त्यांच्या शासकीय वाहनाला धडक देऊन मारण्याचा प्रयत्न केला. खेडेकर यांच्याशी हुज्जत घालून ट्रॅक्टर चालकाला पळवून नेले. बुधवारी दुपारनंतर घडलेल्या या प्रकरणात सायंकाळपर्यंत हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

उपविभागीय अधिकारी प्रशांत खेडेकर हे अवैध गौण खनिज वाहतूक तपासणीतील पथकासह बुधवारी दुपारी २च्या सुमारास खटकाळी बायपास जवळ थांबले होते. या पथकात तलाठी सय्यद अब्दुल कारवाडी, तलाठी प्रदीप इंगोले कन्हेरगाव नाका, वाहन चालक मारोती सिरसाठ यांचा समावेश होता. या वेळी खानापूर चित्ताकडून हिंगोलीकडे येणारे अवैध रेती वाहतुकीतील ट्रॅक्टर खेडेकर थांबवले. वाहनचालक हरी विठ्ठल पाचपुते त्याच्याकडे त्यांनी वाहतूक परवाना अथवा पावतीची विचारणा केली. वाहनचालकाकडे वाहतूक परवान्याबाबतची कागदपत्रे आदी काहीच नव्हते. दरम्यान, खेडेकरांनी त्याला ट्रॅक्टर तहसीलला घेण्याचे सांगितले असता तो ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हता. त्याने ट्रॅक्टरचे मालक प्रवीण डिगांबर जाधव याला या घटनेबद्दल कळवले.

काही वेळातच प्रवीण डिगांबर जाधव दुचाकीवरून घटनास्थळी आला. त्याने प्रशांत खेडेकरांसोबत हुज्जत घातली व शिवीगाळ केली. ट्रॅक्टर तहसील कार्यालयात घेण्यास नकार दिला. खेडेकर आपले शासकीय वाहन (एमएच ३८ जी २९८) मध्ये बसले असता प्रवीण जाधव यांनी आपल्या ट्रॅक्टरने खेडेकर बसलेल्या वाहनाला धडक देऊन त्यांना मारण्याचा प्रयत्न केला. या प्रकारातून शासकीय वाहनाचे टायर फुटून सुमारे ५० हजाराचे नुकसान झाले. मात्र प्रवीण डिगांबर जाधव घटनास्थळावरून आपल्या ट्रॅक्टर चालकास दुचाकीवर बसवून फरार झाला, अशी तक्रार सांगण्यात आली. या प्रकारानंतर उपविभागीय अधिकाऱ्यांनी या घटनेची माहिती देताच ग्रामीण पोलीस ठाण्याचे अधिकारी, कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.

त्यांनी ट्रॅक्टर ताब्यात घेऊन ग्रामीण पोलीस ठाण्यात लावले. तर आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया उशिरापर्यंत सुरू असल्याची माहिती पोलीस ठाण्यातून देण्यात आली.