मंडळ अधिकाऱ्यांनी पकडलेले वाहन पळविले

पालघर : डहाणू तालुक्यातील नरपड  समुद्रकिनारी मोठय़ा प्रमाणावर वाळू माफियांची दहशत पसरली आहे.  अवैध वाळू वाहतूक करत असलेल्या वाहनांवर प्रशासनातर्फे रविवारी मध्यरात्री कारवाई करण्यात आली.  हे वाहन ताब्यात असतानाही प्रशासनाच्या हातावर तुरी देऊन ते पळविण्यात आले.

डहाणू किनाऱ्यावर वाळू माफियांतर्फे मोठय़ा प्रमाणावर वाळू उत्खनन करण्यात येते. मुख्यत: रात्रीच्या वेळी हे उत्खननाचे काम करून त्याची वाहतूक केली जाते.  रविवारी रात्री उत्खनन केलेल्या वाळूची वाहतूक करताना एक  वाहन मंडळ अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले. त्यावर तात्काळ गुन्हा दाखल करण्यासाठी या वाहनास आणि सोबत एका ग्रामस्थास प्रत्यक्षदर्शी म्हणून येथील पारनाका पोलीस ठाण्यात कारवाईसाठी उभा केला. याच दरम्यान  वाहनासह चालक फरार झाला. भर पावसात या वाहनाचा वाहन क्रमांक नोंद न केल्याने सदर प्रशासन अजूनही या वाहनाचा शोध घेत आहे.

दरम्यान या कारवाईबाबत प्रत्यक्षदर्शी म्हणून जबाब नोंदविण्यासाठी मंडळ अधिकारी यांच्यासह उपस्थित असलेले ग्रामपंचायत सदस्य यांना याच गावातील काही ग्रामस्थांनी सामूहिक हल्ला करण्याचा प्रयत्न केला. याचाच अर्थ या नागरिकांचा या वाहनांशी संबंध आहे, असा आरोप होत आहे.

दिवसेंदिवस समुद्रकिनाऱ्यावर होत असलेली वाळू उत्खनन ही गंभीर बाब आहे, याबाबत महसूल प्रशासनासह पोलीस प्रशासन अशा वाळू चोरांवर आळा घालण्यासाठी आणखीन जोमाने मोहीम हाती घेणार आहे यासाठी गावातील नागरिकांच्या सहकार्याने अशा बाबींवर नक्कीच पायबंद घालू त्यासाठी महसूल प्रशासन प्रयत्नशील आहे.

-सौरभ कटियार,  उपविभागीय अधिकारी