वाळूतस्करीची माहिती प्रसारमाध्यमांना माहिती दिल्याच्या संशयावरून मांडवे खुर्द येथील वाळूतस्कर राजेंद्र भाऊ गागरे याने देसवडेचे ग्रामपंचायत सदस्य बाबासाहेब भोर यांना तलवारीने जीवे मारण्याची धमकी दिली. भोर यांच्या तक्रारीवरून पारनेर पोलिसांनी गागरे याच्याविरुद्घ गुन्हा दाखल केला आहे.
मुळा नदीपात्रात वाळूचोरी करणारा ट्रॅक्टर शेतकऱ्याने पकडून तो संगमनेर तालुक्यातील तलाठय़ाच्या ताब्यात दिला. तलाठय़ाकडून वाळूतस्कर तसेच ट्रॅक्टरवर कारवाई होणे अपेक्षित असताना तलाठय़ाने ट्रॅक्टर सोडून दिला. वाळूतस्कर तसेच तलाठय़ामधील संबंधांची चर्चा मांडवेखुर्द तसेच देसवडे गावात सुरू झाल्यानंतर ती माहिती प्रसारमाध्यमांपर्यत पोहोचली.
शेतकऱ्याने ट्रॅक्टर पकडल्याची घटना मंगळवारी घडली. बुधवारी प्रांताधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखालील पथकाने देसवडे येथे दोन ठिकाणी वाळूचे साठे तसेच चोरीची वाळू वाहणारा टेम्पो पकडून कारवाई केली. त्याची बातमी प्रसिद्ध झाल्याने मांडवेखुर्द येथील वाळूतस्कर राजेंद्र गागरे याने भोर यांना तीनदा फोन करून त्याला तलवारीने मारण्याची धमकी दिली. ‘तुझ्या कुटुंबाकडे पाहून घेतो’ अशाप्रकारची दमबाजीही केल्याची तक्रार बाबासाहेब भोर यांनी दिल्यानंतर पोलिसांनी वाळूतस्कर गागरे याच्या विरुद्घ गुन्हा दाखल केला आहे.