अमरावती : वाळू तस्करीचा संशय आल्याने तहसीलदारांनी ट्रकचा पाठलाग सुरू केल्यानंतर अचानकपणे ट्रकचालकाने तहसीलदारांच्या वाहनालाच धडक दिली. सोमवारी सकाळी तळेगाव दशासर ते चांदूर रेल्वेमार्गावर सातेफळ फाटय़ानजीक हा प्रकार घडला. यात धामणगाव रेल्वेचे तहसीलदार अभिजीत नाईक सुदैवाने बचावले, पण वाहनचालक आणि तहसीलदारांचे सहायक गंभीररित्या जखमी झाले.

धामणगाव रेल्वे तालुक्यात वर्धा नदीतून मोठय़ा प्रमाणात वाळूची तस्करी सुरू आहे. महसूल आणि पोलीस प्रशासनाकडून अनेक वेळा  कारवाई होऊनही यावर अंकुश बसलेला नाही. धामणगाव रेल्वेचे तहसीलदार अभिजीत नाईक यांना तळेगाव ते चांदूर रेल्वे मार्गावर वाळू तस्करी सुरू असल्याची माहिती मिळताच ते सरकारी वाहनातून तळेगाव नजीक पोहोचले. त्यांना वाळू भरलेला ट्रक दिसताच त्यांनी पाठलाग सुरू केला. महेंद्र नागोसे हे सरकारी गाडी चालवत होते. सोबत त्यांचे एक सहकारी होते. त्यांनी सुरुवातीला चालकाला ट्रक थांबवण्यास सांगितले. पण, त्याने ट्रक न थांबवता उलट वाहनाचा वेग वाढवला. तहसीलदारांच्या वाहन चालकाने सातेफळ फाटय़ानजीक ट्रकच्या समोर गाडी नेण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी चालकाने त्यांच्या गाडीला जोरदार धडक दिली. या धडकेनंतर गाडीचा समोरचा भाग क्षतिग्रस्त झाला, तर ट्रकही रस्त्याच्या कडेला गेला. या अपघातात वाहनचालक महेंद्र नागोसे आणि शिपाई बढे हे गंभीररित्या जखमी झाले. तहसीलदार अभिजीत नाईक यांना किरकोळ जखमा झाल्या. या घटनेनंतर ट्रकचालक घटनास्थळाहून पसार झाला. या अपघाताची माहिती चांदूर रेल्वे पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी तात्काळ पोहोचून जखमींना बाहेर काढले आणि त्यांना चांदूर रेल्वेच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.

पोलिसांनी ट्रकचालकाच्या विरोधात गुन्हा नोंदवला असून तपास सुरू केला आहे. हा ट्रक दिनेश पावडे या वाळू व्यावसायिकाचा असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांना मिळाली आहे. वाळूच्या ट्रकने सरकारी गाडीला धडक दिल्याचे जखमींनी आपल्या बयाणात सांगितले आहे.