यवतमाळ : घाटंजी तहसीलदारांनी वाळू तस्कारांविरोधात उघडलेल्या मोहिमेने संतापलेल्या वाळू तस्करांनी तहसीलदारांच्या घरासमोर उभे असलेले तलाठय़ाचे चारचाकी वाहन पेट्रोल टाकून जाळले. ही घटना बुधवारी मध्यरात्री दीड वाजताच्या सुमारास घडली. हा प्रकर सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला.

घाटंजीच्या तहसीलदार पूजा मोटोडे यांनी तालुक्यातील अवैध वाळू तस्करांविरोधात धडक मोहीम सुरू केली आहे. महसूल कर्मचाऱ्यांसह त्या रात्री, अपरात्री अवैध वाळू उपसा, साठय़ांवर धाड टाकत असल्याने वाळू तस्कर धास्तावले आहेत. बुधवारी रात्रीही त्या चार ते पाच तलाठय़ांना घेऊन अवैध वाळू तस्करी करणारी वाहने पकडण्यासाठी शासकीय वाहनाने गस्तीवर गेल्या होत्या. या पथकातील तलाठी पवन बोंडे यांनी आपले वाहन तहसीलदारांच्या अंबानगरातील निवासस्थानासमोर उभे केले होते. दरम्यान, पत्रकार असल्याचे सांगून एका व्यक्तीने तहसीलदारांच्या वाहन चालकाकडून हे पथक कोणत्या भागात आहे, याची माहिती घेतली. त्यानंतर रात्री १.१५ वाजताच्या सुमारास काही अज्ञात व्यक्तींनी तहसीलदारांच्या निवासस्थानी येऊन घरासमोर पार्किंग केलेले तलाठी बोंडे यांचे वाहन पेट्रोल टाकून पेटवून दिले. घटनेची माहिती मिळताच तहसीलदार पथकासह परतल्या. तोपर्यंत वाहन जळून खाक झाले होते. वाळू तस्करांविरोधात मोहीम उघडल्यानेच वाहन जाळण्यात आल्याचा आरोप तलाठी बोंडे यांनी केला आहे. वाहन पेटवणारे दोन व्यक्ती तहसीलदारांच्या निवासस्थानी लागलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे.