18 September 2020

News Flash

पारनेर तालुक्यात पुन्हा वाळूतस्करी सुरू

यांत्रिक उपकरणांच्या साहाय्याने वाळूचा उपसा करून चोरीचा उद्योग मुळा नदीपात्रात पुन्हा सुरू झाला आहे. वाळूतस्करांनी तहसील कार्यालयातील एका अधिका-याशी संधान साधून वाळूचोरीस मूकसंमती मिळवली व

| June 19, 2014 03:54 am

यांत्रिक उपकरणांच्या साहाय्याने वाळूचा उपसा करून चोरीचा उद्योग मुळा नदीपात्रात पुन्हा सुरू झाला आहे. तहसीलदार डॉ. विनोद भांबरे यांची बदली होऊन त्यांच्या जागेवर दुस-या अधिका-याची नियुक्ती झालेली नाही. त्याचाच फायदा उठवत वाळूतस्करांनी तहसील कार्यालयातील एका अधिका-याशी संधान साधून वाळूचोरीस मूकसंमती मिळवली व रात्रंदिवस वाळूउपसा सुरू केला आहे.
जिल्हाधिकारी तसेच तहसील कार्यालयातील अधिका-यांना हाताशी धरून तालुक्यासह पुणे जिल्हय़ातील वाळूतस्करांनी तालुक्यातील वाळूसाठय़ांचे लिलाव होऊ दिले नाहीत. लिलाव झालेले नसतानाही वाळूचा लिलाव घेतला असल्याच्या आविर्भावात वाळूतस्कर ठिकठिकाणी नदीपात्रात यांत्रिक उपकरणे घुसवून हजारो ब्रास वाळूची चोरी करीत होते. प्रसारमाध्यमांनी महसूल खात्याचे अधिकारी, कर्मचारी तसेच वाळूतस्करांचे लागेबांधे उघड केल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाने दि. १ मे रोजी नागापूरवाडी येथे वाळूतस्करांची उपकरणे, उपकरणांचे चालक तसेच मालकांवर कठोर कारवाई केली. उपसण्यात आलेल्या वाळूचा पंचनामा करण्यात येऊन वाळूतस्करांना कोटय़वधीचा दंडही ठोठावण्यात आला. या प्रकरणी काही वाळूतस्करांना पोलीस कोठडीची हवा खावी लागल्याने मुळा तसेच इतर नदीपात्रातील वाळूची तस्करी पूर्णपणे थंडावाली होती.
वाळूचोरीच्या पैशाला चटावलेल्या स्थानिक वाळूतस्करांनी मात्र पंधरा दिवस थांबून मजुरांच्या साहाय्याने वाळूउपसा सुरू केला. त्यासाठी महसूलच्या यंत्रणेला हाताशी धरले. मजुरांच्या साहाय्याने वाळूउपसा होत असल्याने उपशाचे प्रमाण कमी होते. तहसीलदार डॉ. विनोद भांबरे यांनीही वाळूचोरीच्या विरोधात कठोर भूमिका घेतल्याने तालुक्यातील वाळूतस्कर शांत होते. परंतु महसूल विभागाच्या प्रशासकीय बदल्यांमध्ये डॉ. भांबरे यांची बदली होऊन त्यांच्या जागी दुस-या अधिका-याची नियुक्तीच न झाल्याने तालुक्यातील वाळूतस्करांनी तहसील कार्यालयातील एका अधिका-याशी संधान साधून यांत्रिक उपकरणांद्वारे वाळूउपसा करण्यासाठी मूकसंमती मिळविली. ती मिळताच मुळा नदीपात्रात रात्रंदिवस वाळूचा उपसा सुरू झाला असून शेकडो वाहनांद्वारे चोरीच्या वाळूची वाहतूक पुन्हा सुरू झाली आहे.
नागापूरवाडी, तास, भुलदरा, मांडवेखुर्द, देसवडे येथे मुळा नदीपात्रात तसेच वनकुटे येथे वाळू नदीपात्रात तसेच निघोज परिसरात कुकडी नदीपात्रात महसूल विभागाच्या मूकसंमतीने वाळूचा भरमसाट उपसा करण्यात येत आहे.
वाळूचोरीप्रकरणी पारनेर पोलिसांकडे महसूल विभागाने आणखी दोन गुन्हे दाखल केले आहेत. एप्रिलमध्ये गुन्हे दाखल होऊनही पोलीस संबंधित आरोपींवर काहीही कारवाई करीत नाहीत.
 प्रभावी टेहळणी यंत्रणा
वाळूचोरीसाठी अधिका-याची मूकसंमती मिळाल्यानंतर तहसील कार्यालय व पोलीस ठाण्यापासून नदीपात्रापर्यंत महसूल, पोलीस कर्मचारी तसेच अधिका-यांवर रात्रंदिवस लक्ष ठेवण्यासाठी ठिकठिकाची टेहळणी यंत्रणा पुन्हा सक्रिय झाली आहे. अधिकारी किंवा कर्मचारी कार्यालयाबाहेर पडताच या यंत्रणेमार्फत नदीपात्रापर्यंत तात्काळ संदेश पोहोचविण्यात येतो. ठराविक अधिका-यांवर चोवीस तास लक्ष ठेवण्यासाठी काही तरुणांची नेमणूक करण्यात आली असून, रात्रीच्या वेळीही हे अधिकारी वाळूतस्करांच्या नजरकैदेत असतात.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 19, 2014 3:54 am

Web Title: sand smuggling start again in parner taluka 2
Next Stories
1 सोलापूर परिसरात अखेर मृग नक्षत्राच्या पावसाची हजेरी
2 सोलापुरात एलबीटीसंदर्भात बैठक भाजप-सेना नगरसेवकांनी उधळली
3 मनपाला भीक न घालता एएमटी बंद!
Just Now!
X