गेल्या आठ दिवसांपासून सिरोंचाच्या जंगलात धुमाकूळ घालणाऱ्या सागवान तस्करांनी बुधवारी रात्री वनखात्याच्या गस्ती पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना केलेल्या बेदम मारहाणीत दोन वनाधिकारी गंभीर जखमी झाले. यानंतर अधिकाऱ्यांनी केलेल्या गोळीबारात एक तस्कर जागीच ठार झाला. या घटनेने या परिसरात कमालीची दहशत निर्माण झाली आहे. महाराष्ट्र व आंध्रच्या सीमेवरून वाहणाऱ्या प्राणहिता व गोदावरी या दोन्ही नद्यांच्या पात्रात सध्या पाणी कमी असल्याने सीमावर्ती भागातील घनदाट जंगलात सागवानाची अवैध तोड व तस्करीत सध्या कमालीची वाढ झाली असून, तस्करांच्या झुंडीच्या झुंडी या भागात तळ ठोकून आहेत. अपुऱ्या संख्याबळाच्या आधारावर या तस्करांना रोखण्याचा प्रयत्न करणाऱ्या वनखात्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना बुधवारी रात्री थरारक अनुभवाला सामोरे जावे लागले.
सिरोंचा वनविभागातील झिंगानूरच्या जंगलात तस्करांची एक टोळी वृक्षतोड करीत असल्याची माहिती मिळाल्यानंतर अधिकारी व कर्मचाऱ्यांचे एक पथक बुधवारी सकाळी कारवाईसाठी या जंगलात गेले होते. रात्री ८ च्या सुमारास या पथकातील ४० कर्मचाऱ्यांना सुमारे दीडशे तस्करांच्या जमावाने घेरले. या पथकाचे प्रमुख सहाय्यक वनसंरक्षक डी. बी. जिद्देवार व वनाधिकारी बी. बी. सिरबोयना या दोघांना तस्करांनी झाडाला बांधले. यानंतर या दोघांना लाठय़ाकाठय़ांनी बेदम मारहाण करण्यात आली. काही तस्करांनी या दोघांच्या हातावर कुऱ्हाडीने वार केले. अधिकारी अडचणीत सापडलेले आहेत हे बघून पथकातील इतर कर्मचाऱ्यांनी एसएलआर बनावटीच्या बंदुकीतून गोळीबार सुरू केला. यात अनुमूल्ला आयलन्ना नरसय्या (वय २८) हा तस्कर जागीच ठार झाला. या घटनेची माहिती मिळताच जवळ असलेल्या रमेशगुडम गावातून आणखी काही तस्कर घटनास्थळी आले व त्यांनी वनकर्मचाऱ्यांकडील शस्त्रे पळवण्याचा प्रयत्न केला. या तस्करांनी पथकातील कर्मचाऱ्यांना मारहाण केली.
तस्करांच्या हल्ल्यात जखमी झालेले चेतन भोयर, रमेश मंडावार, कैलाश डोंगरे, सतिश तुमडे, पुणेश आत्राम, प्रशांत मल्लेलवार या सहा कर्मचाऱ्यांना सिरोंचाच्या रुग्णालयात ठेवण्यात आले आहे. वन कर्मचाऱ्यांनी केलेल्या गोळीबारात ठार झालेला तस्कर रंगधामपेठा येथील राहणारा असून, त्याला योजनापूर्वक ठार करण्यात आले, असा आरोप करीत या भागातील तस्करांनी गुरुवारी दिवसभर धुमाकूळ घातला. या तस्करांनी तीन दिवसांपूर्वी  झिंगानूरच्या जंगलात तस्करांना अटकाव करणाऱ्या वनखात्याच्या चार कर्मचाऱ्यांचे अपहरण केले होते. दोन दिवस ताब्यात ठेवून या कर्मचाऱ्यांना बेदम मारहाण करण्यात आली. नंतर दुसऱ्या दिवशी सोडण्यात आले.
घटनास्थळी जाण्यास पोलिसांचा नकार
या घटनेची माहिती लगेच पोलिसांना देण्यात आली. मात्र, रात्र झाल्याचे कारण समोर करत पोलिसांनी घटनास्थळी जाण्यास नकार दिला. सिरोंचाच्या उपवनसंरक्षक श्रीलक्ष्मी यांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी दुसरे पथक घटनास्थळी पाठवले. या पथकाने जखमी झालेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना आज पहाटे तीनच्या सुमारास सिरोंचाच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. यापैकी जिद्देवार व सिरबोयना या दोन्ही अधिकाऱ्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना नागपूरला हलवण्यात आले आहे.