दुबई महाराष्ट्र मंडळाच्या अध्यक्षपदी मूळ सातारा शहराचे रहिवासी असलेल्या संदीप सुधाकर गुप्ते यांची निवड करण्यात आली आहे.
दुबई, युएई येथे ४७ वर्षांपासून कार्यरत असलेल्या आणि मराठी मनांची अस्मिता मानल्या जाणार्‍या आपल्या पुढील पिढीसाठी आपली महाराष्ट्रीयन संस्कृती आणि परंपरा टिकवून ठेवणे, जोपासणे आणि वृध्दींगत करणे. मायबोली मराठीचा उज्वल आणि गौरवशाली वारसा जपणे. दुबई, युएई मधील मराठी माणसांना एकत्रित ठेवून आपली उज्वल संस्कृती आणि परंपरा परदेशातही टिकवून ठेवण्याचे कार्य दुबई महाराष्ट्र मंडळाकडून सातत्याने केले जात असते.

याच मंडळाच्या अध्यक्षपदावर सातारा शहरातील मंगळवार पेठेतील संदीप गुप्ते यांची निवड झाली आहे.  साताऱ्यात शिक्षण घेतलेले संदीप गुप्ते हे उच्चशिक्षणानंतर नोकरीनिमीत्त दुबईमध्ये स्थायिक झाले. दुबईतील एका कंपनीत ऑटोमोबाईल इंजिनियर म्हणून कार्यरत असणारे संदीप गुप्ते यांनी गेली २४ वर्ष विविध आखाती देशांमध्ये मराठी सांस्कृतिक क्षेत्रात कार्य केले आहे. त्यांनी यापूर्वी मस्कत आणि दुबई महाराष्ट्र मंडळाचे सचिव म्हणूनही उत्कृष्ट काम केले आहे. सन २०१९ ते २० या कालावधीसाठी त्यांची अध्यक्ष म्हणून निवड झाली आहे. मराठी आणि महाराष्ट्राची संस्कृती जतन आणि संवर्धन करण्याचे कार्य नेटाने केले जाईल, असे निवडीप्रसंगी गुप्ते म्हणाले.  गुप्ते यांच्या निवडीबद्दल त्यांचे विविध स्तरातून अभिनंदन होत आहे.