मी सैनिकाचा मुलगा आहे. त्यामुळे कोणत्याही दबावाखाली येणार नाही. आरोप करणारे काहीही करोत, वेळ येईल तेव्हा आपण सव्याज त्यांची परतफेड करू, असे काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संदीप सावंत यांनी सांगितले. राणेंनी मारहाण केल्यानंतर ठाणे येथे रुग्णालयात उपचार घेऊन सावंत काल चिपळूणमधील आपल्या घरी परतले. या वेळी ग्रामीण भागातील अनेक नागरिक व काँग्रेसचे कार्यकर्ते त्यांची विचारपूस करण्यासाठी उपस्थित होते.

या वेळी बोलताना सावंत म्हणाले की, हा माझा नवीन जन्म आहे. कोण म्हणतो हा बनाव आहे, पण लवकरच सत्य बाहेर येईल. याच घरामधून मला नेण्यात आले. आपण काय चूक केली हे ईश्वराला माहिती. काही तरी पुण्याचे काम केले म्हणून आपण आज जिवंत आहोत. आपल्या मागे एकाही राजकीय पक्षाच्या नेत्याचा आशीर्वाद नसल्याचेही त्यांनी सांगितले.

मी आठ वर्षे नीलेश राणेंसोबत काम केले. त्यांनी आजपर्यंत किती पैसे दिले हे सिद्ध करावे. आरोप करणारे काहीही करोत त्यांचे तोंड दाबू शकत नाही. आपल्याकडे असणारी गाडी पक्षाने दिलेली असल्याचेही त्यांनी सांगितले.

नीलेश राणेंचे काम करताना आपण कधीही अन्य पक्षाचा विचार केला नाही. त्यांना देव म्हणून पाहिले. आता माझ्यासाठी नीलेश राणे देव राहिले नाहीत, असे सांगताना या घटनेसंदर्भात आपण तिळमात्र मागे हटणार नाही, असेही सावंत यांनी स्पष्ट केले.

राणेसाहेब मोठे आहेत. ते मला त्यांच्या घरातील मानतात. मी त्यांच्यावर बोलण्याएवढा मोठा नाही. मात्र आपल्यावर जे आरोप झाले आहेत त्यांची सव्याज परतफेड वेळ-काळ पाहून आपण करू, अशी स्पष्ट भूमिकाही त्यांनी मांडली. काँग्रेस पक्ष आपण मरेपर्यंत सोडणार नाही, असे सांगतानाच माझ्या कार्यकर्त्यांशी मी चर्चा करणार आहे. आपले सामाजिक काम मात्र यापुढेही चालू राहील, असेही सावंत यांनी स्पष्ट केले.