भूमी अधिग्रहण कायद्याविरोधात जनजागृती करण्यासाठी जिल्हय़ात उद्यापासून (गुरुवारी) शनिवापर्यंत तीन दिवस राहुल गांधी संदेश पदयात्रा काढण्यात येणार आहे. युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष धीरज देशमुख यांनी ही माहिती दिली.
उदगीर येथून या पदयात्रेस प्रारंभ होईल. शुक्रवारी (दि. १०) शंभू उमरगा व शनिवारी शिरपूर येथे लोकांशी जाहीर संवाद साधण्यात येईल. बारा गावांमधून ६० किलोमीटर अंतर पदयात्रेतून कापले जाणार असून, गावोगावी लोकांशी भूमी अधिग्रहण कायद्याबाबत काँग्रेस पक्षाची भूमिका मांडली जाणार आहे. १८९४ मध्ये इंग्रजांनी भूमी अधिग्रहणसंबंधी तयार केलेला कायदा २०१३ मध्ये राहुल गांधी यांनी बदलला होता. शेतकऱ्यांच्या संमतीशिवाय जमिनीचे अधिग्रहण करता येणार नाही. बाजारभावाप्रमाणे मूल्यांकनाची तरतूद यात करण्यात आली होती. उद्योगपतींचे हित साधणारे व शेतकरी विरोधातील भाजप सरकार सत्तेवर आल्यानंतर त्यांनी या कायद्यात बदल करण्याचा घाट घातला. या कायद्याविरोधात ४२ लोकसभा मतदारसंघांतून १ हजार ७०० किलोमीटर अंतर पार करीत राहुल गांधी संदेश पदयात्रा विविध जिल्हय़ांत जाणार आहे. युवक काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस पृथ्वी जोशी, निरीक्षक आदित्य पाटील, शहर युवक काँग्रेस अध्यक्ष विक्रांत गोजमगुंडे, महापौर अख्तर मित्री, अॅड. त्र्यंबकदास झंवर, मोईज शेख, दत्तात्रय बनसोडे आदी उपस्थित होते.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on July 9, 2015 1:40 am