गेल्या काही दिवसांपासून आपल्या वक्तव्यांमुळे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी सातत्याने चर्चेत असून आज (रविवार) त्यांची जीभ पुन्हा घसरली आहे. एकवेळ हिजड्याशी लग्न केलं तर त्याला मुलं होतील, पण सिंचन योजना काही पूर्ण होणार नाहीत असे आम्हाला वाटले होते. पण भाजपा सरकारने इच्छा शक्तीच्या जोरावर ही सिंचन योजना पूर्ण करून दाखवली, असे वादग्रस्त वक्तव्य गडकरी यांनी केले. सांगली येथे आयोजित कृषी मेळाव्यात ते बोलत होते.
गेल्या अनेक वर्षांपासून टेंभू योजना रखडली आहे. त्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते. त्यांनी सुरूवातीलाच हे उदाहरण सांगण्याची इच्छा नाही. पण सांगतो असे म्हणत, त्यांनी म्हटले की, टेंभू योजना अनेक वर्षांपासून रखडली आहे. मध्यंतरी एक नेते माझ्याकडे आले. त्यांनी या योजनेच्या पुर्ततेबाबत माझ्याकडे आग्रह केला. मी त्यावेळी त्यांना सांगितले की, एकवेळ हिजड्याशी लग्न केले तर मुले होतील. पण या सिंचन योजना काय पूर्ण होणार नाहीत. कारण तेव्हा मला तसे वाटत ही होते.
परंतु, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकारच्या साहाय्याने ही योजना पूर्ण झाली. वाटलेही नव्हते की, असे कधी होईल. पण तुमचा आशीर्वाद, मुख्यमंत्र्यांची इच्छाशक्ती, दृढनिश्चय यामुळे आज हा प्रकल्प पूर्ण झाला आहे. भाजपा सरकारच्या काळात या योजना पूर्ण झाल्या आहेत, असे त्यांनी निक्षून सांगितले. यावेळी व्यासपीठावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सहकार मंत्री सुभाष देशमुख, गिरीश महाजन यांच्यासह अनेक स्थानिक नेते उपस्थित होते.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on December 23, 2018 6:53 pm