मंत्री म्हणून मिळालेल्या संधीचा उपयोग तालुका व शहराच्या विकासासाठी करून घेतला. आगामी पन्नास वर्षे समोर ठेवून शहर विकासाचे नियोजन केले आहे. त्यात नागरिकांचाही सहभाग आवश्यक आहे. कोटय़वधी रुपयांची कामे करताना त्याचे मोल योग्य वेळी दिले पाहिजे अशी अपेक्षा असते, असे प्रतिपादन महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले.
प्रवरा नदीवरील सेतू पूल ते १३२ केव्हीपर्यंतच्या अकोले बायपास रस्त्याच्या बाह्यवळण कामाचा शुभारंभ थोरात यांच्या हस्ते झाला. या वेळी ते बोलत होते. नाशिक येथे होत असलेल्या सिंहस्थ मेळ्याच्या निधीतून संगमनेरसाठी पाच कोटी रुपयांचा निधी मिळाला. या निधीतून या रस्त्याचे काम हाती घेण्यात आले. आमदार डॉ. तांबे अध्यक्षस्थानी होते. नगराध्यक्ष दिलीप पुंड, माजी नगराध्यक्षा दुर्गा तांबे, उपनगराध्यक्ष जावेद जहागीरदार, काँग्रेसचे शहराध्यक्ष विश्वास मुर्तडक व्यासपीठावर होते.
थोरात म्हणाले, संगमनेरमध्ये होत असलेल्या साकूर फाटा-शिरापूर-निंभाळे या ११ कोटीच्या व प्रवरा नदीवरील सेतू पुल ते अकोले बाह्यवळण मार्ग या रस्त्याच्या माध्यमातून दक्षिण भारतातल्या लोकांची नाशिकला जाण्याची सोय होणार आहे. सिंहस्थासाठी सरकार करत असलेल्या कामाचा हा एक भाग आहे. दि. १५ ऑगस्टपूर्वी या रस्त्याचे काम झालेच पाहिजे, असे त्यांनी ठेकेदार आणि अधिका-यांना सुनावले.