संगमनेरमधील जमजम कॉलनीत पोलिसांनी दोन हजार किलोपेक्षा अधिक गोमांस जप्त केले आहे. दोन वाहनांतून या गोमांसाची वाहतूक सुरू होण्यापूर्वीच पोलिसांनी ही वाहने आणि गोमांस ताब्यात घेत चार जणांवर कारवाई केली. कारवाईत पोलिसांनी नऊ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

संगमनेरमध्ये अनेक ठिकाणी बेकायदा कत्तलखाने सुरू आहेत. पोलिसांनी या कत्तलखान्यांवर वारंवार कारवाया देखील केल्या. मात्र, अजूनही हे कत्तलखाने सर्रास सुरू आहेत. जमजम कॉलनीतील दोन कत्तलखान्यातून दोन वाहनांमधून मोठ्या प्रमाणात गोमांसची वाहतूक होणार असल्याची माहिती शहर पोलिसांना मिळाली होती. यानुसार पोलीस निरीक्षक अभय परमार यांच्या पथकाने शनिवारी रात्री साडेदहाच्या सुमारास संबंधित ठिकाणी छापा टाकला. त्यावेळी दोन टेम्पोत त्यांना मोठ्या प्रमाणात गोमांस आढळून आले. पोलिसांनी गोमांस, दोन्ही टेम्पो आणि दोघा वाहनचालकांना ताब्यात घेत पोलिस ठाण्यात आणले.

पोलिस कर्मचारी शिवाजी बोडखे यांच्या फिर्यादीवरून रात्री उशिराने गणेश शांताराम कुऱ्हाडे, कौसर नसीर शेख या दोघा वाहनचालकांसह कत्तलखाना मालक सुफीयान नासीर शेख, लाला हाजी कुरेशी यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. कत्तलखान्याचे दोन्ही मालक फरार झाले असून पोलिसांनी वाहनचालकांना मध्यरात्री अटक केली.