संगमनेर : शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे तीनही पक्ष वैचारिकदृष्टय़ा तीन टोकाचे आहेत. मात्र त्यांच्याबरोबर काम करताना आनंद वाटतो. कारण ही माणसे चांगली आहेत. त्यामुळे सरकारबाबत कोणीही चिंता करण्याची गरज नाही, किंबहुना आगामी दशक महाविकास आघाडीचेच असेल, असा ठाम विश्वास शिवसेनेचे युवा नेते आणि राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी शुक्रवारी येथे व्यक्त केला.

अमृतवाहिनी संस्थेतील मेधा महोत्सवात ‘संवाद तरुणाईशी’ या कार्यक्रमात पर्यावरण आणि पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे, राज्यमंत्री अदिती तटकरे, आ. रोहित पवार, आ. धीरज देशमुख, आ. ऋतुराज पाटील, आ. झिशान सिद्दीकी यांनी सहभाग घेतला. प्रसिद्ध गायक व संगीतकार अवधूत गुप्ते यांनी खुमासदार शैलीत या नवतरुण आमदारांच्या मुलाखती घेतल्या.

या वेळी राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, युवक काँग्रसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे, कांचनताई थोरात उपस्थित होते.

आदित्य ठाकरे म्हणाले की, काँग्रेस-राष्ट्रवादीतील माणसं मैत्री करण्यासाठी खूप चांगली आहेत. महाराष्ट्रातील अनेक घराण्यांतील युवक राजकारणातील वसा घेऊ न काम करत आहेत. मीही लोकशाही पद्धतीने राजकारणात आलो आहे. मला तरुणांच्या अपेक्षापूर्ती, शेतकरी, कष्टकरी यांच्यासाठी काम करायचे आहे. मंत्री म्हणून घेतलेली शपथ आपल्या जीवनातला सर्वात अनमोल ठेवा आहे असे ते म्हणाले.

अदिती तटकरे म्हणाल्या, की लहानपणापासूनच घरात राजकीय वातावरण होते वडिलांची दिवस-रात्र काम करण्याची पद्धत यामुळे मी राजकारणात आले. शरद पवार हे अतिशय आदर्श व्यक्तिमत्त्व असून तीन पिढय़ांशी समरस होणारे ते एकमेव नेते आहेत.

रोहित पवार म्हणाले, की शरद पवार हे या वयातही समाजकारणात सक्रिय आहेत. राज्यातील अनेकांना वाटले ते निवृत्त होतील. परंतु गर्व करणाऱ्यांचे त्यांनी गर्वहरण करून महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केले आहे. गोरगरीब आणि शेतकऱ्यांसाठी काम करण्याचा मंत्र त्यांनी तरुणांना दिला आहे. आज त्यांचा काम करण्याचा उत्साह, ऊ र्जा पाहून सर्वाना त्यांच्यापासून प्रेरणा मिळते आहे.

धीरज देशमुख म्हणाले, की मंत्री बाळासाहेब थोरात व विलासराव देशमुख यांचे प्रेम सर्वश्रुत आहे. हे माझे खरे हिरो आहेत. मराठवाडय़ासह महाराष्ट्र दुष्काळमुक्त करणे हे पित्याचे स्वप्न साकार करण्यासाठी आपण काम करणार असल्याचे ते म्हणाले.

.. आणि आदित्य ठाकरे लाजले

लग्नाचा प्रश्न काढताच आदित्य ठाकरे लाजले. ते म्हणाले की, माझ्या लग्नाचा मुद्दा आईने बाबांवर सोडला आहे. मी त्यावर काही बोलणार नाही, पण अजून काही ठरलेले नाही. अदिती तटकरे यांनी मात्र विवाहाच्या मुद्दय़ावर माझा जोडीदार मीच निवडणार असे सांगितले.