संगमनेर : अर्थिकदृष्टय़ा देशाला सक्षम करण्यासाठी अर्थमंत्र्यांनी विविध घटकांशी सुरू केलेला संवाद ही आर्थिक क्षेत्रात बदलाच्या प्रक्रियेची सुरुवात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश बदलतोय, राज्यही प्रगतिपथावर जात आहेत. लोकसभा निवडणुकीत मिळालेला जनाधार हा लोकांच्?या मनातील कलच होता. विधानसभा निवडणुकीतही २२० जागांचे उद्दिष्ट साध्य करताना संगमनेरने आता मागे राहू नये, अशी अपेक्षा गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे यांनी व्यक्त केली.

संगमनेर व्यापारी असोसिएशनच्या वतीने विखे यांच्या उपस्थितीत संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. व्यापारी आणि उद्योजकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांवर सरकारची भूमिका स्पष्ट करतानाच व्यापार उद्योगात करांच्या संदर्भात निर्माण होणाऱ्या प्रश्नाबाबत मुख्यमंत्र्यांशी संगमनेरच्या व्यापाऱ्यांशी चर्चा घडवून आणू आशी ग्वाही विखे यांनी दिली. उद्योजक डॉ. संजय मालपाणी, अध्यक्ष नीलेश जाजू, माजी नगराध्यक्ष राधावल्लभ कासट, श्रीगोपाल पडतानी, ज्ञानेश्व्र करपे, शिवसेनेचे आप्पा केसेकर, संजय फड ,राजेंद्र सांगळे यांच्यासह व्यापारी मोठय़ा संख्येने उपस्थित होते. दक्ष महेश कटारिया या विद्यार्थ्यांच्या शोधासाठी मंत्री विखे यांनी केलेल्या सहकार्याबद्दल कटारिया परिवाराच्या वतीने सत्कार करून कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.

यावेळी  विखे म्हणाले की, संगमनेरच्या बाजारपेठेने मोठी परंपरा राखली, या तालुक्याच्या विकासात मोलाचे योगदान दिले आहे. वस्तू सेवा कराच्या अंमलबजावणीनंतर व्यापारी आणि उद्योजकांनी उपस्थित केलेल्या शंका आणि कराच्या आकारणीतील त्रृटी दूर करण्यासाठी केलेल्या सूचनांचा स्वीकार सरकारने केला. सामान्य माणसासाठी असलेल्या जीवनावश्यक वस्तूंवरील कर कमी करून दिलासा देण्याचे  काम सरकारने केले याकडे विखे यांनी लक्ष वेधले.

नोटाबंदीनंतर बाजार पेठेवर झालेल्या परिणामावर भाष्य करताना विखे म्हणाले की,अनेकांनी रिअल इस्टेटमध्ये केलेल्या गुंतवणुकीचा हा परिणाम आहे. गृहनिर्माण मंत्रिपदाची जबाबदारी घेतल्यानंतर अनेक बांधकाम व्यावसायिक मला भेटले. २०१० पासून बांधलेली घरकुल आज विक्रीविना उभी आहेत. बाजारपेठेतील मंदीचा हा देखील एक परिणाम असल्याचे स्पष्ट करून त्यांनी सांगितले की, बांधकाम व्ययवसायाशी २६ घटक जोडले गेलेले आहेत,  याबाबत आपली केंद्रीय मंत्री आणि मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली असून या व्यवसायाला कसा दिलासा देता येईल, असा प्रयत्न आपण निश्चित करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर केल्यानंतर आता अर्थ विभागाशी निगडित असलेल्या घटकांशी सुरू केलेला संवाद हा समस्यांच्या सोडवणुकीसाठी महत्त्वपूर्ण ठरणार असून या संवादातूनच देशाच्या अर्थव्यवस्थेचा पाया अधिक मजबूत होणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

या प्रसंगी डॉ. संजय मालपाणी यांनी उत्पादक आणि व्यापारी यांच्यावर जीएसटी कराचे असलेले संकट स्पष्ट करून बाजारपेठेवर याचा विपरीत परिणाम होत असल्याकडे लक्ष वेधताना राज्याचा एखादा मंत्री व्यापाऱ्यांच्या समस्या समजावून घेण्यासाठी स्वत:हून येतात हे संगमनेरात प्रथमच घडल्याबद्दल समाधान व्यक्त केले. अध्यक्ष नीलेश जाजू यांनी व्यापाऱ्यांना कोणतेही अनुदान नाही, व्यावसायिक नियमाप्रमाणे आकारली जाणारी घरपट्टी वीजबील याबाबत शासनाने विचार करण्याची मागणी केली. याप्रसंगी संचालक श्रीगोपाल पडतानी, राजेंद्र सांगळे यांनी मनोगत व्यक्त केले. दिनेश सोमाणी यांनी सूत्रसंचालन आणि अशोक भुतडा यांनी आभार मानले.

२२० जागांचे उद्दिष्ट

संगमनेरच्या व्यापारी मित्रांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर विखे म्हणाले की, महाजनादेश यात्रेच्या निमिताने मुख्यमंत्री संगमनेरात येत आहेत त्यावेळी तुमच्या शिष्टमंडळाशी भेट घडवून आणण्याचे आश्वासित करतानाच विखे म्हणाले की, लोकसभेच्या निवडणुकीत मिळालेला जनाधार पाहता लोकांच्या मनात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सरकारच्या धोरणांविषयीची भावना स्पष्ट होती. राज्यातही विधानसभेत काही वेगळे घडणार नाही. २२० जागांचे उद्दिष्ट पक्षाने ठेवले आहे. यामध्ये संगमनेरही असावे, कधीतरी बदल घडवा अजून किती दिवस तीच भाषण तुम्ही ऐकणार असा सवालही त्यांनी शेवटी केला.