राज्यात महायुतीची सत्ता येण्याची चिन्हे स्पष्ट दिसत असून, गेल्या काही दिवसांपासून आपण चालू केलेल्या पुन्हा संघर्ष यात्रेचाही या परिवर्तनात मोठा वाटा आहे, असे प्रतिपादन आमदार पंकजा मुंडे यांनी पत्रकार बैठकीत केले.
डॉ. गोपाळराव पाटील, सूरजित ठाकूर, संभाजी पाटील निलंगेकर, गोिवद केंद्रे, आमदार सुधाकर भालेराव, नागनाथ निडवदे, रमेश कराड आदी या वेळी उपस्थित होते. मुरूड येथे होणाऱ्या जाहीर सभेपूर्वी पंकजा मुंडे यांनी लातुरात पत्रकार बैठक घेतली. आपल्या यात्रेला सर्वत्र चांगला प्रतिसाद मिळत आहे. राज्यातील जनता आघाडी सरकारवर प्रचंड नाराज आहे. सरकारच्या कारभाराची लक्तरे वेशीवर टांगणार आहोत. आमची सत्ता येताच महत्त्वाच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यात येईल. यात्रेविषयी युवक-महिलांमध्ये मोठय़ा प्रमाणात उत्साह असून सगळीकडे चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. बंद खोलीतील कार्यक्रमांपेक्षा मदानात उतरून काम करण्याची सवय गोपीनाथ मुंडे यांना होती. त्यांची प्रेरणा घेऊनच आपण संघर्ष यात्रेच्या निमित्ताने मदानात धडक मारली. यातून अधिकाधिक माणसे जोडण्याचा प्रयत्न असल्याचे त्या म्हणाल्या.

‘यात्रा म्हणजे घरचे लग्न नव्हे’!
माझी संघर्ष यात्रा पक्षाने निश्चित केली आहे. छोटेमोठे रुसवेफुगवे पाहण्यात आपल्याला वेळ नाही. हे काही माझ्या घरचे लग्न नाही. त्यामुळे कोणी नाराज असेल, तर स्वतंत्र कार्यक्रम घेऊन सर्वाना निमंत्रित करेन, असे पंकजा मुंडे म्हणाल्या. माजी आमदार पाशा पटेल यात्रेदरम्यान आपल्याला भेटून गेले. त्यांचे आशीर्वाद आपल्यासोबत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
‘देशमुख-मुंडे मत्रीचे दुसरे पर्व’
विलासराव देशमुख व गोपीनाथ मुंडे यांच्या पक्षातीत मत्रीचे सर्वत्र कौतुक होते. राजकारणात मैत्री आडवी येऊ दिली नाही आणि मत्रीत त्यांनी राजकारण केले नाही. तोच वारसा पुढील पिढीतही आपण चालवत असून अमित देशमुख व आपली मत्री याच पद्धतीने पुढेही सुरू राहणार असल्याचे पंकजा म्हणाल्या. मत्री म्हणजे सेटिंग नव्हे, याची जाणीव आपल्याला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.