कामेरी येथील ९४ वर्षांच्या आजीने करोनावर मात केली आहे. सोमवारी दुसरी करोना चाचणीही नकारात्मक आल्याने रुग्ण महिलेची रवानगी आता मिरजेतील शासकीय तंत्रनिकेतन मधील विलगीकरण कक्षामध्ये करण्यात आली असल्याची माहिती नोडल अधिकारी डॉ. संजय साळुंखे यांनी दिली.

वाळवा तालुक्यातील कामेरी येथील तरुणाला कृष्णा हॉस्पिटलमध्ये कार्यरत असताना करोनाची लागण झाली होती. यामुळे त्याच्या संपर्कात आलेल्या ९४ वर्षांच्या महिलेची करोना चाचणी २८ एप्रिल रोजी सकारात्मक आल्याने उपचारासाठी मिरजेतील करोना रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. १४ दिवसाच्या उपचारानंतर या महिलेच्या सलग दोन करोना चाचण्या घेण्यात आल्या. दोन्ही चाचण्या नकारात्मक आल्याने या महिलेने करोनावर मात केल्याचे स्पष्ट झाले.

दरम्यान, सांगलीतील करोना बाधित रुग्णाच्या संपर्कात आलेल्या २१ जणांच्या स्वॅबचे नमुने मंगळवारी करोना चाचणीसाठी घेण्यात आले असून त्याचा अहवाल संध्याकाळी उशिरापर्यंत हाती येईल असे डॉ. साळुंखे यांनी सांगितले. अहमदाबादहून आलेल्या खानापूर तालुक्यातील साळिशगे येथील महिलेला करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर तिच्यासोबत आलेल्या ९ व्यक्तींना संस्थात्मक विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले असून तिच्या पतीचा अहवाल नकारात्मक आला आहे, मात्र अन्य आठ जणांच्या स्वॅबचा अहवाल प्रतीक्षेत आहे.