सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत सोमवारी कॉंग्रेस नेते पतंगराव कदम यांच्या नेतृत्त्वाखालील वसंतदादा रयत पॅनेलने राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या जयंत पाटील गटाचा धुव्वा उडवला. प्रत्यक्ष निवडणूक झालेल्या १६ जागांपैकी ४ जागांवर रयत पॅनेलचे उमेदवार विजयी झाले आहेत. तर ११ जागांवर या पॅनेलचे उमेदवार आघाडीवर आहेत. जयंत पाटील गटातील केवळ मदन पाटील यांनाच विजय मिळवता आला आहे.
रयत पॅनेलमधील प्रशांत शेजाळ, अजिन बनसोडे आणि अभिजित चव्हाण हे विजयी झाले आहेत. कृषी उत्पन्न बाजारसमितीच्या एकूण १९ जागांपैकी तीन जागांवर दोन्ही पॅनेलपैकी कोणीही उमेदवार उभे केले नव्हते. तिथे अपक्ष उमेदवार बिनविरोध निवडून आले होते. उर्वरित १६ जागांपैकी केवळ एकाच जागेवर जयंत पाटील यांच्या नेतृत्त्वाखालील पॅनेलला विजय मिळवता आला आहे. अन्य १५ जागांपैकी चार जागांवर त्यांचे उमेदवार विजयी झाले आहेत. तर उर्वरित ११ जागांवर त्यांच्या उमेदवारांनी निर्णायक आघाडी घेतली आहे.
पतंगराव कदम आणि जयंत पाटील हे राज्यातील दोन्ही माजी मंत्री या निवडणुकीच्या निमित्ताने एकमेकांसमोर उभे ठाकल्याने या निवडणुकीकडे सांगली जिल्ह्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले होते.