News Flash

अनिकेत कोथळेच्या भावांचा पोलीस ठाण्याबाहेर आत्मदहनाचा प्रयत्न

पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेतले

अमित कोथळे आणि आशिष कोथळे अशी या भावंडांची नावे असून पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेतले आहे.

सांगलीतील अनिकेत कोथळे मृत्यूप्रकरणात पोलिसांच्या तपासावर पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. तपास योग्यपद्धतीने होत नसल्याचा आरोप करत अनिकेतच्या दोन भावांनी पोलीस ठाण्याबाहेर आत्मदहनाचा प्रयत्न केला. अमित कोथळे आणि आशिष कोथळे अशी या भावंडांची नावे असून पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेतले आहे.

अनिकेत कोथळे या तरुणाला सांगली शहर पोलिसांनी जबरी चोरी प्रकरणी ६ नोव्हेंबर रोजी अटक केली होती. चौकशी दरम्यान पोलिसांनी अनिकेतला बेदम मारहाण केली आणि या मारहाणीत अनिकेतचा मृत्यू झाला. हे प्रकरण अंगलट येऊ नये यासाठी पोलीस उपनिरीक्षक युवराज कामटे आणि अन्य पाच पोलिसांनी अनिकेतचा मृतदेह आंबोलीतील जंगलात नेऊन जाळला. अनिकेत पोलिसांच्या तावडीतून पळाला, असा बनावही पोलिसांनी रचला होता. मात्र अनिकेतच्या कुटुंबीयांनी पाठपुरावा केल्याने अनिकेतचा मृत्यू झाल्याचे समोर आले. याप्रकरणी युवराज कामटेसह पाच जणांना अटक करण्यात आली. तर सांगली शहर पोलीस ठाण्यातील सात कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले.

अनिकेत कोथळे मृत्यूप्रकरण दडपण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप कुटुंबीयांनी यापूर्वीही केला होता. मंगळवारी अनिकेतचे भाऊ अमित आणि आशिष कोथळे या दोघांनी सांगली शहर पोलीस ठाण्याबाहेर अंगावर पेट्रोल ओतून स्वत:ला जाळून घेण्याचा प्रयत्न केला. ड्यूटीवरील पोलीस कर्मचाऱ्यांनी दोघांना वेळीच रोखले आणि पुढील अनर्थ टळला. या घटनेची माहिती मिळताच अनिकेतच्या पत्नीनेही पोलीस ठाण्यात धाव घेतली. या घटनेनंतर पोलीस ठाण्याबाहेर पुन्हा गर्दी झाली होती.

दरम्यान, कोथळे हत्याप्रकरणातील मुख्य आरोपी युवराज कामटे यांच्यासह अन्य पाच आरोपींची गेल्या आठवड्यात न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. १५ दिवस या आरोपींची पोलीस कोठडीत कसून चौकशी सुरु होती. मात्र या आरोपींनी तपासात कोणतेही सहकार्य केले नाही, असे सूत्रांनी सांगितले. आरोपींविरोधात ९० दिवसांत आरोपपत्र दाखल करु अशी माहिती पोलिसांनी दिली होती. या प्रकरणात हलगर्जीपणाचा ठपका ठेवत पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी दिपाली काळे यांची बदली देखील करण्यात आली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 28, 2017 2:21 pm

Web Title: sangli aniket kothale custodial death brothers attempted suicide by self immolation raises question police investigation
Next Stories
1 लातूर-नांदेड मार्गावर क्रुझर-टेम्पोचा भीषण अपघात; ७ ठार, १३ जण गंभीर जखमी
2 राज्यातील ६४ खासगी खारभूमी योजनांच्या सरकारीकरणाचा प्रस्ताव
3 सुधारणेच्या नावाखाली गर्भगृहाचा उंबरठा हटविला
Just Now!
X