सांगली जिल्ह्यातील आटपाडीच्या उत्तरेश्वर यात्रेत सत्तर लाखांची मागणी झालेल्या मोदी बकऱ्याचा वारस असलेल्या १६ लाखांच्या बकऱ्याची शनिवारी पहाटे चोरी झाली आहे. याबाबत पोलिस ठाण्यात रितसर तक्रार दाखल करण्यात आली आहे. सांगोला तालुक्यातील चांडोळवाडी येथील बाबूराव मेटकरी यांच्या मोदी बकऱ्याचा दर दीड कोटी रुपये सांगण्यात आला होता. या बकऱ्यासाठी सत्तर लाखांपर्यंतची बोली झाली होती. मात्र मेंडपाळ मेटकरी यांनी बकरा विकण्यास नकार दिला होता. त्याचाच वारस असलेल्या सहा महिन्यांचा बकरा आटपाडीधील शेतकरी सोमनाथ जाधव यांनी पाळला होता.
आटपाडीमधील शेगदामळा येथे हा बकरा ठेवण्यात आला होता. शनिवारी पहाटे दोन ते तीनच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी बकऱ्याची चोरी केली असून हा बकरा नेण्यासाठी चारचाकी वाहनाही वापरले असल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. आटपाडीतील उत्तरेश्वर यात्रेमध्ये या बकऱ्याला १५ लाख रुपये मोजण्याची तयारी दर्शवण्यात आली होती. मात्र १६ लाख रुपये आले तरच बकरा विकरा जाईल, असे सांगत जाधव यांनी व्यवहार करण्यास नकार दिला होता.
बकरा चोरीची घटना उघडकीस येताच सरपंच वृषाली पाटील आणि ग्रामपंचायत सदस्यांनी घटनास्थळी भेट दिली. लोकांनीही जनावरांची विशेष काळजी घेण्याची खबरदारी घ्यायला हवी, असे सांगितले. पोलिस निरीक्षक अरुण देवकर यांनीही घटनास्थळी जाऊन चोरट्याचा माग मिळतो का याची पाहणी केली.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on December 27, 2020 11:27 am