News Flash

सांगली भाजपमध्ये वाढती खदखद

गोपीचंद पडळकर यांच्या विधान परिषद उमेदवारीमुळे निष्ठावंत अस्वस्थ

संग्रहित छायाचित्र

दिगंबर शिंदे

विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी भाजपने गोपीचंद पडळकर यांना उमेदवारी दिल्याने सांगली जिल्ह्य़ाला एक अतिरिक्त आमदार मिळणार असला तरी त्याचे स्वागत होण्याऐवजी भाजपअंतर्गत खदखदच बाहेर पडत आहे.

धनगर समाजाच्या आरक्षणावरून ज्या पडळकरांनी आरेवाडीच्या बनामध्ये भाजपला पराभूत करण्यासाठी बिरोबाची आण घेऊन मोदींना पराभूत करण्याचे आवाहन हार्दिक पटेल यांच्या साक्षीने केले, त्याच पडळकरांना देण्यात आलेली संधी निष्ठावंत गटाला पचनी पडण्यास अवघड जात आहे.

विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये हक्काचे आमदार होण्यासाठी पडद्यामागून भाजपला ह्तिावह राजकारण आणि सांधेजोड करणारे दिग्गज पश्चिम महाराष्ट्रामध्ये आहेत. प्रदेशाध्यक्ष पदही पुणे जिल्ह्यातून विधानसभेत प्रतिनिधित्व करणारे कोल्हापूरचे चंद्रकांत पाटील यांच्याकडे आहे. त्यांच्याकडे रोजचा राबता असणारे भाजपमध्ये पहिल्या फळीचे अनेक नेते सांगलीत आहेत. विधान परिषदेवर संधी देण्यासाठी यापैकी एकाची निवड केली जाईल असा होरा सर्वाचाच होता. मात्र माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व अटकळ बाजूला ठेवून पश्चिम महाराष्ट्रातून आटपाडीचे गोपीचंद पडळकर यांना संधी मिळवून दिली.

पडळकर यांचे वक्तृत्व तरुणाईला भुरळ पाडणारे आहे. त्यांनी लोकसभा निवडणूक नजरेसमोर ठेवून भाजपशी काडीमोड घेत पक्षाचे अधिकृत उमेदवार संजयकाका पाटील यांच्या विरोधात बहुजन वंचित आघाडीच्या माध्यमातून मैदानात उतरण्याची कुचराई केली, असा आक्षेप निष्ठावंत गटाचा आहे. मात्र ही लढाई केवळ दिखाऊपणा होता, हे त्यांना बारामती मतदारसंघातून भाजपने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याविरोधात भाजपने उतरविले त्यावेळीच स्पष्ट झाले. कारण लोकसभेच्यावेळी सांगलीत एकास एक लढत झाली तर भाजपची अडचण होऊ शकते हे ओळखून पडळकर यांना मैदानात उतरण्यास भाग पाडले गेले. त्याचवेळी वंचित आघाडी ही भाजपची बी टीम असल्याचाही आरोप करण्यात आला होता.

पश्चिम महाराष्ट्रातील सांगलीसह सोलापूर, कोल्हापूर, सातारा आणि पुणे ग्रामीण भागात भाजपाला निर्णायक स्थिती मिळवून देण्यात पक्षाचे प्रदेश सचिव मकरंद देशपांडे यांचा वाटा मोलाचा आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांच्या साथीने अन्य पक्ष फोडून का असेना भाजपची ताकद वाढविण्यात यश आले. सांगली जिल्हा परिषद, महापालिका येथील सत्ता हस्तगत करण्यासाठी या आयारामांची मोलाची मदत झाली. यामुळेच हक्काच्या आमदारकीसाठी निष्ठावंत गटाला संधी मिळेल असा होरा होता. मात्र राजकारणात एक अधिक एक बरोबर दोन असे कधीच असत नाही याची प्रचीती यानिमित्ताने आली.

पडळकर यांचे सामाजिक आणि राजकीय कार्य फार मोठे आहे असे म्हणता येणार नाही, मात्र धनगर समाजातील तरुणाईला आकर्षित करण्यासाठी लागणारी भाषणबाजी निश्चित आहे. त्यांच्या आमदारकीने समाजाचा प्रश्न मिटले असे म्हणण्याचे धाडस या घडीला तर करता येणार नाही, आणि त्यांच्या आमदारकीमुळे भाजपला फार मोठा लाभ होणार असेही नाही. त्यांना संधी देण्यामागे नेमके काय हेतू आहेत हे आज अनाकलनीय असले तरी पक्षामध्ये कोणाला मोठे होऊ द्यायचे नसावे, असे मानले जात आहे.

भाजपचे काँग्रेसीकरण?

अगोदरच राज्यातील भाजपची सत्ता हातची गेली आहे. त्यामुळे कार्यकर्ते आजही अस्वस्थ आहेत. आणि त्यात ज्यांनी भाजपला शिव्या-शाप दिले, त्यांच्याच स्वागताची तयारी करण्याची वेळ निष्ठावंतावर आल्याने अंगाचा तिळपापड होणे स्वाभाविक आहे. आयारामांच्या ताकदीवर मोठे झालेल्या भाजपचे वेगाने काँग्रेसीकरण होत असल्याचेच हे द्योतक आहे. याचे पडसाद नजीकच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीवेळी काय होतात हे पाहणे रंजक ठरणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 13, 2020 12:20 am

Web Title: sangli bjp is on the rise abn 97
Next Stories
1 माजी मंत्री राम शिंदेही नाराज !
2 पाचव्या मंजुरीनंतर तरी सांबरकुंड धरण मार्गी लागणार का?
3 धुळ्यात करोनामुळे दोन महिलांचा मृत्यू
Just Now!
X