14 December 2019

News Flash

सांगलीच्या आयर्वनि पुलाची नव्वदी!

सांगलीचे पुण्याशी आणि उर्वरित महाराष्ट्राशी दळणवळण सुलभ आणि गतीने व्हावे यासाठी आयर्वनि पुलाची उभारणी करण्यात आली.

(संग्रहित छायाचित्र)

|| दिगंबर शिंदे

पूल उभारणीत सहभागी लक्ष्मीबाई पुजारींच्या हस्ते वाढदिवस साजरा :- कधी रौद्र रूपाच्या तर कधी संथ पाणी घेऊन वाहणाऱ्या कृष्णेला कवेत घेउन दिमाखात इतिहासाची साक्ष देत ठामपणाने उभ्या असलेल्या सांगलीच्या आयर्वनि पुलाचा सोमवारी ९० वा वाढदिवस साजरा करण्यात आला. गेली ९ दशके अव्याहतपणे सेवा देत असलेल्या या पुलाच्या उभारणीसाठी ज्या हातांनी दगड धोंडे उचलले त्या १०४ वर्षांच्या लक्ष्मीबाई पुजारी या महिलेच्या हातांनी केक कापून या पुलाचा वाढदिवस साजरा करण्यात आला.

सांगलीचे पुण्याशी आणि उर्वरित महाराष्ट्राशी दळणवळण सुलभ आणि गतीने व्हावे यासाठी आयर्वनि पुलाची उभारणी करण्यात आली. या पुलाचे उद्घाटन १८ नोव्हेंबर १९२९ रोजी करण्यात आले होते. या पुलाने अनेक पावसाळे, उन्हाळे पाहत असताना सांगलीकरांच्या अनेक आठवणींचा साक्षीदार होण्याचे भाग्य मिळविले आहे. या आठवणींना उजाळा देण्यासाठी यंदा आगळ्यावेगळ्या पध्दतीने वाढदिवस साजरा करण्याचा निर्धार कार्यकर्त्यांनी केला.

सामाजिक कार्यकत्रे शिवाजी ओउळकर यांनी या पुलाच्या उभारणीत आपले रक्त आणि घाम गाळणाऱ्या लक्ष्मीबाई कामन्ना पुजारी या १०४ वर्षांच्या महिलेचा शोध लावला. सध्या ही महिला विजयनगर येथे मुलीच्या नातीकडे वास्तव्यास असून आजही तिची स्मरणशक्ती तल्लख आहे.

पुलाच्या उभारणीची आठवण सांगत असताना श्रीमती पुजारी यांनी सांगितले,की कर्नाटकातील विजापूर, अथणी परिसरात खायला अन्नही मिळत नव्हतं, त्यावेळी अन्नाच्या शोधात सांगली जवळ केली. त्या वेळी पुलाचे काम सुरू झाले होते. या कामासाठी मजुरांना दररोजचा रोजगार पुरुषाला बारा आणे तर महिलेला आठ आणे मिळत होता, आणि तोही रोजच्या रोज. या पुलावर रोजंदारी करीत असताना या महिलेचे वय अवघे दहा वर्षे होते.

अशा शेकडो हातांनी आणि बलगाडीच्या राबत्यांनी या आयर्वनि पुलाची उभारणी झाली असून १९२७ मध्ये काम सुरू झालेल्या या पुलाचे काम १९२९ मध्ये पूर्ण झाले. यासाठी साडे सहा लाख रुपये खर्च करण्यात आला होता. पुण्याच्या व्ही. आर. रानडे यांच्या कंपनीकडे या कामाचा मक्ता होता.

या पुलाचे आरेखन आणि देखरेख सांगली संस्थानचे राज्य अभियंता व्ही.जी. भावे यांच्याकडे होते. सांगलीचे अधिपती चिंतामणराव पटवर्धन यांच्या कारकिर्दीत या पुलाची उभारणी करण्यात येऊन तत्कालीन गव्हर्नर आयर्वनि यांच्या हस्ते १८ नोव्हेंबर १७२९  रोजी या पुलाचे लोकार्पण करण्यात आले होते.

First Published on November 19, 2019 1:00 am

Web Title: sangli bridge akp 94
Just Now!
X