‘निर्धार फाउंडेशन’चे कार्य

सांगली : तब्बल ३६ तास राबून निर्धार फाउंडेशनच्या ३० ते ३५ तरुणांनी महापुराच्या पाण्यात बुडालेली सांगलीची अमरधाम स्मशानभूमी गुरुवारी स्वच्छ केली. स्मशानभूमीत साचलेला दोन-तीन फुटाचा चिखल दूर केल्यानंतर स्मशानभूमी स्वच्छ करण्यासाठी तब्बल ४५ हजार लिटर पाण्याचा वापर गुरुवारी करावा लागला.

महापूर ओसरल्यानंतर महापालिका कर्मचारी स्वच्छतेच्या कामात गुरफटले असताना निर्धार फौंडेशनच्या तरुणांनी पाण्यात बुडालेली अमरधाम स्मशानभूमी स्वच्छ करण्याचा विडा उचलला. राकेश दोडण्णावर या तरुणाच्या नेतृत्वाखाली संघटनेचे ३० ते ३५ युवक गेले चार दिवस स्वच्छतेचे काम करीत होते. रोज आठ ते नऊ तास खोऱ्याने चिखल काढून तो  नदीपात्रात पुन्हा सारण्याचे काम अविश्रांत सुरू होते.

आज सकाळी चिखल दूर केल्यानंतर पाण्याचे संपूर्ण स्मशानभूमीचा परिसर अग्निशमन विभागाच्या वाहनातून पाणी आणून धुवून काढण्यात आला. यासाठी सुमारे ४५ हजार लिटर पाण्याचा वापर करण्यात आला असून ही स्मशानभूमी पुन्हा चकाचक करण्यात आली आहे.

निर्धार फौंडेशनच्या या सामाजिक कार्याचे जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी, महापौर दिग्विजय सूर्यवंशी आणि महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांनी कौतुक केले.

निर्धार फौंडेशनने तत्पूर्वी महापूर आलेल्या इनामधामणी, बामणी, बौध्द विहार, मगरमच्छ कॉलनी आदी ठिकाणची चिखलाने माखलेली मंदिरे, शाळा स्वच्छ करून परिसरात धूर  व औषध फवारणीही केली आहे. या कामात दीप कांबळे, सिद्राम कांबळे, तन्वीर जमादार, हृषीकेश तुपलोंढे, सहदेव मासाळ, सतिश कट्टीमणी, राहूल पवार, महेश घोरपडे आदी युवकांचा पुढाकार होता.