News Flash

सांगलीत राष्ट्रवादीचे पानिपत

काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस नेत्यांच्या परस्परांवरील आरोप- प्रत्यारोपाने गाजलेल्या सांगली, मिरज व कूपवाड महापालिकेच्या निवडणुकीत काँग्रेसने राष्ट्रवादी काँग्रेसचा धुव्वा उडवित निर्वविाद वर्चस्व सिध्द केले. ३७

| July 8, 2013 10:06 am

काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस नेत्यांच्या परस्परांवरील आरोप- प्रत्यारोपाने गाजलेल्या सांगली, मिरज व कूपवाड महापालिकेच्या निवडणुकीत काँग्रेसने राष्ट्रवादी काँग्रेसचा धुव्वा उडवित निर्वविाद वर्चस्व सिध्द केले. ३७ प्रभागातील ७६ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत ४० जागा जिंकून काँग्रेसने एकहाती सत्ता काबीज केली. तर सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसची मतदारांनी अवघ्या १७ जागांवर बोळवण केली. आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर झालेल्या या निवडणुकीतील वनमंत्री पतंगराव कदम, माजीमंत्री मदन पाटील आणि केंद्रीय कोळसा राज्यमंत्री प्रतीक पाटील या काँग्रेसच्या नेत्यांची एकजूट काँग्रेसच्या विजयाची शिल्पकार ठरली, तर राष्ट्रवादीचे नेते व ग्रामविकास मंत्री जयंत पाटील यांच्यासाठी हा पराभव जिल्ह्यातील त्यांच्या वर्चस्वाला धुळीस मिळवणारा ठरला.
महापालिकेच्या चौथ्या पंचवार्षकि निवडणुकीत राज्यात सत्तास्थानी असलेल्या काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीत महापालिका निवडणुकीनिमित्त बिघाडी निर्माण झाली होती. या दोन्ही पक्षातील ज्येष्ठ नेत्यांनी एकमेकांवर गंभीर आरोप-प्रत्यारोप केले होते. त्यामुळे संपूर्ण राज्याचे लक्ष या निवडणुकीकडे लागले होते. महापालिकेची सत्ता पुन्हा हस्तगत करण्याचे काँग्रेसचे स्वप्न साकारले आहे. तर शिवसेना व भाजप या पक्षांना एकही जागा जिंकता आली नाही. अपक्ष म्हणून निवडून आलेल्यांमध्ये काँग्रेसच्या चार बंडखोर उमेदवारांचा समावेश आहे.  

पक्षीय बलाबल
काँग्रेस     ४०
राष्ट्रवादी काँग्रेस     १७
स्वाभिमानी विकास आघाडी     ९
अपक्ष     ९
मनसे     १

जनतेला कसे नेतृत्व हवे याचा कौल
कराड – सांगली महानगरपालिकेच्या निवडणुकीत सांगलीकर मतदारांनी काँग्रेसला अतिशय स्पष्ट कौल दिला आहे. गेल्या पाच वर्षांच्या कारभाराचा हा अभिप्राय असून, आगामी कालावधीमध्ये कशाप्रकारचे नेतृत्व हवे हे या निकालावरून स्पष्ट होत आहे.    
पृथ्वीराज चव्हाण, मुख्यमंत्री

राष्ट्रवादीला चोख उत्तर
दक्षिण महाराष्ट्रात मजबूत असलेल्या काँग्रेसला िखडार पाडण्याचे काम राष्ट्रवादी काँग्रेसचे काही नेते करीत होते. त्याला सांगलीकर जनतेने मतदानाद्वारे चोख प्रत्युत्तर दिले आहे.
– डॉ. पतंगराव कदम, पालकमंत्री सांगली

कौल स्वीकारला
पाच वर्षांत अनेक विकासकामे केली, पण मतदारांपर्यंत ती पोहोचविण्यात अपयश आले. जनतेचा कौल मान्य करून यापुढेही सांगलीच्या विकासासाठी काम करत राहू
– जयंत पाटील, ग्रामीण विकासमंत्री

वसंतदादा गटाचा विजय
गेली पाच वर्षे वसंतदादा पाटील गटाला नेस्तनाबूत करण्याचा जयंत पाटील यांनी केलेला प्रयत्न सांगलीकर मतदारांनी उधळून लावला आहे. त्यामुळेच काँग्रेसला घवघवीत यश मिळाले आहे.
– मदन पाटील, काँग्रेसचे नेते व माजी मंत्री

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 8, 2013 10:06 am

Web Title: sangli civic polls congress wins 40 seats setback for ncp
टॅग : Congress
Next Stories
1 टोलविरोधी महामोर्चातून प्रकटला करवीरकरांचा उद्रेक
2 बृहन्महाराष्ट्र मंडळ अधिवेशन
3 धोतराच्या पायघडय़ा घाली परीट.. वडार बंधू ओढी रथ माउलीचा!
Just Now!
X