एलबीटी हटविण्यासाठी व्यापाऱ्यांनी सोमवारी बंदची हाक दिली असून मोर्चाने जाऊन महापालिका आयुक्तांना प्रतीकात्मक दुकानाची किल्ली देण्याचा निर्णय बठकीत घेण्यात आला. एलबीटी वसुलीसाठी महापालिका प्रशासनाने व्यापाऱ्यांविरुद्ध कठोर पावले उचलली असून शहरातील ३५ व्यापाऱ्यांची बँक खाती महापालिकेने सील केल्यानंतर एलबीटीवरून व्यापाऱ्यांचा संघर्ष तीव्र झाला आहे.
राज्य शासनाने एलबीटी अथवा जकात याबाबत महापालिकांना स्वायत्तता दिली आहे. त्यानंतर सांगलीत प्रशासनाने एलबीटी वसुलीसाठी कठोर पावले उचलली आहेत. ३५ व्यापाऱ्यांची बँक खाती सील केल्यानंतर आणखी १०० हून अधिक व्यापाऱ्यांची खाती सील करण्याची कारवाई मंगळवारपासून करण्यात येणार असल्याचे आयुक्त अजिज कारचे यांनी जाहीर केले आहे.
प्रशासनाने कठोर भूमिका घेतल्यानंतर शनिवारी व्यापाऱ्यांची पाटीदार भवन येथे बठक झाली. एलबीटी हद्दपार करण्यासाठी उद्या (सोमवार) सांगली महापालिका क्षेत्रात बंद पाळण्यात येणार आहे. गणेश मंदिरापासून व्यापाऱ्यांची रॅली काढण्यात येणार असून मोर्चाने जाऊन महापालिका आयुक्तांना प्रतीकात्मक किल्ल्या देण्याचा निर्णय या बठकीत घेण्यात आल्याचे व्यापारी असोसिएशनचे विराज कोकणे यांनी सांगितले. एलबीटीबाबत सकारात्मक निर्णय झाला नाही, तर अनंत चतुर्दशीनंतर सांगलीत बेमुदत बंद पाळण्याचा निर्णय घेण्यात आला असून व्यापाऱ्यांच्या आंदोलनाला मेडिकल असोसिएशनने पािठबा जाहीर केला आहे.
व्यापाऱ्यांच्या या बठकीस अरुण दांडेकर, एमआयडीसी मॅन्युफॅक्चिरग असोसिएशनचे सचिन पाटील, अण्णा कोरे, समीर शहा, सुरेश पटेल, धीरेन शहा, गौरव शेठजी, सुदर्शन माने, अशोक शहा आदी उपस्थित होते.