भाजप सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणांचा निषेध करण्यासाठी काँग्रेसने सांगलीत केलेल्या आंदोलनावेळी एक कार्यकर्त्याला सोमवारी गळफास लागला असता आणि आंदोलन त्याच्या प्राणांवर बेतले असते. पण सोबतच्या कार्यकर्त्यांनी प्रसंगावधान दाखवून वेळीच प्रयत्न करून संबंधित कार्यकर्त्याच्या गळ्याभोवतीचा गळफास काढल्याने तो बचावला. संतोष पाटील असे या कार्यकर्त्याचे नाव आहे.
सांगलीमध्ये काँग्रेसने भाजप सरकारच्या विरोधात आंदोलन केले. सरकारची धोरणे शेतकरी विरोधी आहेत. त्यामुळे शेतकरी आत्महत्या करीत आहेत, यासाठी आंदोलन करण्यात आले. आंदोलनावेळी प्रतिकात्मक गळफास लावून सरकारचा निषेध व्यक्त करण्यात येणार होता. पण ही कृती करणाऱ्या एका कार्यकर्त्याचा पाय घसरल्यामुळे त्याच्या गळ्याभोवतीचा गळफास ताणला गेला. यावेळी प्रसंगावधान दाखवून सोबतच्या कार्यकर्त्यांनी लगेचच त्याला पकडून त्याच्याभोवतीचा गळफास काढून टाकला. लगेचच मिळालेल्या मदतीमुळे हा कार्यकर्ता बचावल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.