महापालिका प्रशासनाने सोपविलेल्या जबाबदारीचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याप्रकरणी चार कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले  आहे. कामचुकारपणा व पाणी वसुलीतील रकमेचा घोटाळा केल्याप्रकरणी महापालिका आयुक्त अजिज कारचे यांनी या चार कर्मचाऱ्यांविरुद्ध निलंबनाची कारवाई केली.
बांधकाम विभागातील निरीक्षक डी.डी.पवार, पाणी पुरवठय़ातील तपासनीस व कारकून प्रकाश साळुंखे, साहाय्यक तुषार पवार आणि घरपट्टी विभागातील कनिष्ठ कारकून मोहन दाणेकर अशी निलंबित करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांची नांवे आहेत.
महापालिकेच्या आíथक अडचणींना सामोरे जावे लागत असताना उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न अपेक्षित आहेत. मात्र कर्मचाऱ्यांकडून असे प्रयत्न होत असल्याचे दिसून येत नाही. पाणी बिल वसुलीमध्ये ७० ते ८० हजाराची तफावत आढळून आली. या शिवाय खाजगी केबल कंपनीकडून परवानगीपेक्षा अतिरिक्त खुदाई होत असताना दुर्लक्ष करण्याचा प्रकार बांधकाम विभागातील कर्मचाऱ्यांकडून होत असल्याचे निदर्शनास येताच आयुक्त श्री. कारचे यांनी एकाचवेळी चार कर्मचाऱ्यांना घरचा रस्ता दाखविला आहे. यामुळे महापालिकेच्या कर्मचारी वर्गात खळबळ माजली आहे.